प्रतिनिधी / बेळगाव
शेतकऱयांची ऊस बिले देणे बाकी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मलप्रभा साखर कारखान्याने तीन वर्षांपूर्वीची बिले देणे बाकी आहे. ते सर्व शेतकरी अडचणीत आले असून तातडीने आम्हाला ऊस बिले द्या, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी मलप्रभा साखर कारखान्याकडे बिलासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, कारखान्याचे व्यवस्थापक केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीच करत नाहीत. महापूर, कोरोना यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यातच या साखर कारखान्याने ऊस बिले दिली नसल्यामुळे शेतकरी आणखी मोठय़ा संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे शेतकऱयांनी बिले मिळवून देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱयांनी तातडीने कारखान्याच्या व्यवस्थापकांना संपर्क साधून ऊस बिले देण्याचा आदेश दिला आहे. जिह्यातील केवळ दोन साखर कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता 2 हजार 700 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. शिरगुप्पी आणि बेडकीहाळ या साखर कारखान्यांनी हे आश्वासन दिले आहे. मात्र इतर 22 साखर कारखान्यांनी अद्याप दराबाबत निर्णयच घेतला नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तातडीने इतर साखर कारखान्यांनीही ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.