ढेबेवाडी फाटय़ावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे विकण्यासाठी मलकापूरच्या ढेबेवाडी फाटय़ावर आलेल्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या. संशयिताकडून दोन पिस्टल, चार मॅगझिन, 30 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. संशयिताकडे शस्त्रे खरेदी करण्यासाठी येणाराचा पोलीस शोध घेत असून त्यासाठी सोमवारी चार ठिकाणी छापे टाकले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्हय़ात बेकायदेशीर शस्त्रs बाळगणाऱयांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथक कराड, मलकापूर परिसरात संशयितांवर नजर ठेवून होते. पोलीस निरीक्षक पाटील यांना खबऱयामार्फत माहिती मिळाली, की मलकापूरच्या ढेबेवाडी फाटा येथे एक संशयित गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी तत्काळ कराड परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास अलर्ट रहायला सांगितले. ढेबेवाडी फाटा येथे हे पथक साध्या वेशात दबा धरून बसले होते.
दरम्यान, एक इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याच्या हालचालीचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्याला पकडले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल आढळले. त्याच्या पॅन्टच्या खिशात जिवंत काडतूस सापडली. त्याच्याकडील पिशवी तपासली असता पिशवीमध्ये आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल असे एकूण दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार मॅगझीन, 30 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. संशयित वापरत असलेला मोबाईलही जप्त केला आहे. संशयिताकडे एकूण एक लाख 37 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. त्याला पकडून कराड पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असून ही शस्त्रे खरेदी करणारांसह त्याचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, शरद बेबले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.