तुर्की ग्रां प्रि : जेतेपदासह सातव्यांदा ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप पटकावली
वृत्तसंस्था/ इस्तंबुल
तुर्की ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने माजी महान ड्रायव्हर मायकेल शुमाकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. हॅमिल्टनने सातव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सर्वात यशस्वी ड्रायव्हर होण्याच्या शुमाकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. येथील शर्यतीत रेसिंग पॉईंटच्या सर्जिओ पेरेझने दुसरे, फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने तिसरे स्थान मिळविले.
फेरारीचा माजी महान ड्रायव्हर जर्मनीच्या मायकेल शुमाकरनेही सात वेळा ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप मिळविली होती. 35 वर्षीय हॅमिल्टनने याआधीच अनेक विक्रम नोंदवत अन्य ड्रायव्हर्सना मागे टाकले असून त्यात सर्वाधिक शर्यती जिंकणे, सर्वाधिक वेळा पोल पोझिशन्स व पोडियम फिनिश या विक्रमांचा समावेश आहे. येथील शर्यतीवेळी अनेक गाडय़ा स्पिन झालेल्या आणि आघाडीत वरचेवर बदल होत असल्याचे पहावयास मिळाले. हॅमिल्टनचे हे एकूण 94 वे जेतेपद असून शुमाकरपेक्षा त्याने तीन शर्यती जादा जिंकल्या आहेत. ही शर्यत त्याने सहाव्या स्थानावरून सुरू केली होती आणि टायर व्यवस्थापन आणि कौशल्याच्या बळावर त्याने पहिले स्थान पटकावण्यात यश मिळविले. शर्यतीत भाग घेतलेल्या ड्रायव्हर्सनी हॅमिल्टनचे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले, त्यात त्याचा संघसहकारी व्हाल्टेरी बोटासचाही समावेश आहे. बोटासची गाडी स्पिन झाल्याने तो मागे पडला आणि अखेर 14 व्या स्थानावर त्याला समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मर्सिडीजने सलग सातव्यांदा कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप याआधीच जिंकली आहे.
रेसिंग पॉईंटच्या लान्स स्ट्रोलने पहिल्यांदाच पोल पोझिशनवरून सुरुवात केली होती. पण त्याचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले आणि 37 व्या लॅपवेळी त्याला पिट स्टॉप घ्यावे लागल्यानंतर त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फेरारीच्या चार्लस लेकलर्कने चौथे, मॅक्लारेनच्या कार्लोस सेन्झने पाचवे, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने सहावे, रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बॉनने सातवे, मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने आठवे, रेनॉच्या डॅनियल रिकार्डोने दहावे स्थान मिळविले. नॉरिसला सर्वात वेगवान लॅपचा बोनस गुणही मिळाला.









