मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीवर धडक, मराठ्यांचा राजकीय पक्ष स्थापन झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रजेला राजा हा लागतोच. त्याप्रमाणे मराठा समाजालाही सक्षम नेतृत्वाची गरज असून ते नेतृत्व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी करावे. त्यासाठी मराठा महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीवर धडक द्यावी लागेल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप यांनी सोमवारी येथे केले. तसेच मराठा समाजाला न्याय मिळायचा असेल तर मराठा महासंघाचा राजकीय पक्ष स्थापन करावा. त्यामध्ये 15 वर्षापुढील युवकांना सभासद करावे, असेही जगताप यांनी सांगितले.
शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित कार्यकारीणीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राज्य कार्यालयीन सचिव प्रमोद जाधव, नूतन जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, नूतन महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, जिल्हा प्रभारी अभिजीत शिंदे, नेताजी सुर्यवंशी, शाहीर दिलीप सावंत, धनंजय सावंत, नूतन युवक जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील आदींची होती.
मराठा आरक्षणावरुन धूळफेक सुरु आहे. मराठा आरक्षण देणारे पण आपलेच होते व आता काढून घेणारेही आपलेच आहेत. मराठÎांना आरक्षण मिळू नये याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. परंतु लाचार मराठे राजकारणासाठी गप्प बसले आहेत, असा आरोप दिलीप जगताप यांनी केला. प्रजेला राजा हा लागतोच. त्याप्रमाणे मराठा समाजालाही लढाऊ सक्षम नेतृत्वाची गरज असून ते नेतृत्व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी करावे. त्यांच्यामागे साडे तीन कोटी मराठा समाज पाठीशी राहील. त्यामुळे शाहू महाराजांना विनंती करण्यासाठी मराठा महासंघाने पुढाकार घ्यावा, असे जगताप म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीला धडक द्यावी लागेल. त्यासाठी कोल्हापूरातून 10 हजार मराठÎांचे उद्दीष्ट ठेवावे. त्यामध्ये दिल्लीसह आसपासच्या परिसरातील मराठे सहभागी होऊन सुमारे 1 लाखाचा हा मोर्चा निघेल या दृष्टीने तयारी करावी, असे आवाहनही जगताप यांनी केले. वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणामध्ये केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावे. अन्यथा 2016 पेक्षा ही मोठे आंदोलन या दोन्ही सरकारविरोधात करावे लागेल. या दोघांना धडकी भरविण्यासाठी साडे तीन कोटी मराठा रस्त्यावर उतरतील.
इंद्रजीत माने यांनी स्वागत पेले. मारुती माने यांनी प्रास्ताविक केले.
जाब विचारण्याचे धाडस जाणता राजाने केले नाही
मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करुन त्यामध्ये बदल करता येऊ शकतो. परंतु त्यासाठी 50 टक्केचा बाऊ केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी जी स्थगिती दिली. तशा पध्दतीने गेल्या 72 वर्षात कोणी स्थगिती दिली नाही. याबाबत जाणत्या राजाने दिल्लीवाल्यांना जाब विचारण्याचे धाडस केले नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे नाव न घेता जगताप यांनी लगावला.









