जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट घटतोय, संयम बाळगा : जयंत पाटील
प्रतिनिधी / सांगली
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्नही केले. आता केंद्राने संसदेत त्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. छत्रपती संभाजीराजे सर्वांना भेटून केंद्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. जिल्हÎातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट घटतोय. आणखी सात-आठ दिवसात आकडेवारी कमी होईल, लोकांनी आणखी काहीसा संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी शनिवारी सांगलीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. खासगी डॉक्टरांकडून तत्काळ उपाययोजना केल्या जात नव्हत्या. जिह्यातील सर्व डॉक्टरांना कळवून कोरोना उपचारासाठी अधिक वेळ न घालवता तत्काळ उपचाराबाबतच्या सूचना दिल्या आहेत.खासगी डॉक्टरांकडून तशी कार्यवाही होत असल्याचे दिसून येते.
मराठा आरक्षणबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. याबाबत आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण वेळोवेळी भूमिका स्पष्ट करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रामाणिकपणे प्रयत्नही केले. आरक्षण टिकविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. आता हे आरक्षण कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये काही भूमिका घेण्याची गरज आहे. केंद्राने सकारात्मक भूमिका घेतल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे चित्र दिसते. छत्रपती संभाजी महाराज आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच यश येईल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची जिह्यातील परिस्थिती निवळत चालली आहे. गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांखाली आला आहे. आणखी सात-आठ दिवसात आकडेवारी कमी होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिह्यातील आकडेवारी वेगवेगळी आहे. काही जिह्यातील पॉझिटिव्हिटी दर 24 ते 26 टक्के आहे. काही ठिकाणी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
संभाव्य पूर परिस्थितीबाबत कोल्हापुरात बैठक
संभाव्य पूर परिस्थितीचा पार्श्वभूमीवर सरकारने तयारी सुरू केली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची गेल्या आठवडÎात अशी बैठक घेतली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अधिकाऱयांची समन्वय बैठक कोल्हापुरात दोन दिवसात घेतली जाणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.








