सरपंचासह छायापत्रकार व इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात. गावातील रस्त्यांची स्थिती चांगली नसल्याने होत आहे विरोध. मानवी जिविताला धोका. सरकारी अधिकाऱयांच्या धोरणांबाबत स्थानिकांची नाराजी.
डिचोली/प्रतिनिधी
मये गावातील मुख्य रस्त्यांची सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक असतानही या रस्त्यावरून होणारी खनिज वाहतूक काल बुध. दि. 16 मार्च रोजी सकाळी स्थानिक लोकांनी अडवून धरली. यावेळी मयेच्या सरपंचा घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच गावकरवाडा मये येथील स्थानिक रहिवासी छात्रापत्रकार संदीप देसाई हेही घटनास्थळी होते. वाहतुकीच्या मुद्यावरून चर्चा सुरू असतानाच उपजिल्हाधिकारी दिप वायंगणकर यांनी सरपंच, छायापत्रकारासह सर्वांना ताब्यात घेण्याची सुचन करताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून पैरा येथील चौगुले खाण कंपनीचा ई लिलावाचा खनिज माल मये गावतील रस्त्यावरून ट्रकांद्वारे नेला जात आहे. सदर वाहतूक मागील काळात दोन तीन वेळा विविध कारणास्तव अडविण्यात आली होती. सध्या मयेतील मुख्य रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून मुख्य जलवाहिनी घालण्यचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्वीच अरूंद व वळणांचा असलेला हा रस्त अधिकच धोकादायक बनला आहे. दोन चारचाकी वाहने सुरळीतपणे सध्या सदर रस्त्यावरून सुटत नाहीत. अशा परिस्थितीत खनिज ट्रक या रस्त्यावरून धावत आहेत. सदर रस्त्याची स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत या रस्त्यावरून खधिज वाहतूक करू नये. अशी मागणी मयेतील लोकांनी तसेच मये पंचायतीने पत्रकार परिषदेद्वारे केली होती.
मये गावातील श्री देवी केळबाई देवीचा कळसोत्सव सुरू असल्याने गावातून होणारी खनिज वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मंगळ. दि. 15 रोजी रात्री मयेतील कळसोत्सवाची सांगता झाली. रात्री देवीचा कळस मंदिरात प्रवेश झाल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली. सदर उत्सव संपताच काल बुधवारी पहाटेपासूनच खनिज वाहतुकीला प्रारंभ करण्यात आला. सदर वाहतुकीत मयेतील कळसोत्सवासाठी स्थानिकांकडून करण्यात आलेल्या सजावटीची नासधूस करण्यात आली. रस्त्यांवरून साकारण्यात आलेले तोरण व इतर सजावट ट्रकांनी तोडून टाकली. त्यामुळे स्थानिक लोक अधिकच नाराज झाले.
त्यातच रस्त्याची स्थिती धोकादायक आणि सर्वत्र धुळीचे साम्राज्य. या कारणास्तव गावकरवाडा मये येथील स्थानिकांनी गावकरवाडा येथील महामाया मंदिराजवळच खनिज वाहतूक करणारे ट्रक अडविले. यावेळी सरपंचा सीमा आरोंदेकर, सखाराम पेडणेकर, छायापत्रकार संदीप देसाई, अजित सावंत, संजय आरोंदेकर व इतरांची उपस्थिती होती. या प्रकरणाची माहिती मिळताच डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर, उपनिरीक्षक प्रजित मांदेकर व पोलीस फौजफाटा मयेत दाखल झाला. तसेच उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर हेही घटनास्थळी दाखल झाले.
या विषयावर सरपंचा व इतरांनी गावच्या हिताचा विषय मांडला. गावातील रस्त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर खनिज वाहतूक केली तरी किहीच हरकत नाही. सध्याचे रस्ते हे धोकादायक असून खनिजवाहू ट्रकांमुळे लोकांच्या जिविताला धोका आहे. असे म्हटले. तसेच संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने तेही लोकांच्या आरोग्याला अपायकारक आहे. त्यामुळे सध्या ही वाहतूक बंदच करावी, असा पवित्रा सरपंचा सीमा आरोंदेकर यांनी घेतला.
यावेळी सखाराम पेडणेकर तसेच स्थानिक रहिवासी व छायापत्रकार या नात्याने गावची बाजू मांडली. व खनिज वाहतूक करण्यास आक्षेप घेतला. या लोकांशी चर्चा करीत असताना उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी सरपंचा, छायापत्रकारासह सर्वांना ताब्यात घेण्याची पोलिसांना सुचना केली. त्यानुसार सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात सरपंचा सीमा आरोंदेकर, सखाराम पेडणेकर, संदीप देसाई, अजित सावंत, संजय आरोंदेकर, विठ्ठल गखवस, राजेंद्र कारबोटकर, मनोराज नाईक यां?ना पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. त्यांना नंतर उपजिल्हाधिकाऱयांसमोर सादर करून सोडण्यात आले.
या लोकांना ताब्यात घेताच त्यांची मागणी अक्षरशः पायदळी तुडविताना त्याच मार्गाने खनिज वाहतूक सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे मये गावातील लोकांनी तसेच या मार्गावरून नियमित ये जा करणाऱया लोकांकडून सरकारी अधिकाऱयांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
या घटनेमुळे मयेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिकेरी मये येथे एक जेटी आहे. त्या जेटीवरून खनिज मालाची बार्जद्वारे वाहतूक केल्यास कोणत्याही प्रकारची समस्या किंवा कोणताही धोका उदभवू शकत नाही. परंतु सरकारतर्फे मयेतील धोकादायक रस्त्यावरूनच सदर खनिज वाहतूक केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येय आहे. लोकांच्या जिविताची जबाबदारी सरकारच आणि सरकारी अधिकारीच घेत नसल्यास कोण घेणार ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मयेतील शेतकऱयांना या खाण कंपनीकडून झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही देण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याची धोकादायक परिस्थिती या पार्श्वभूमीवर गेल्या काहीच दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेतर्फे मयेत खनिज वाहतूक अडविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यांच्या विषयावरून वाहतूक अडविण्यात आली होती. मयेतील कळसोत्सवामुळे सदर खनिज वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परंतु कळसोत्सवाची सांगता होताच लगेच पहाटेच खनिज वाहतुकीला प्रारंभ करून सरकार आणि हे सरकारी जबाबदार अधिकारी मयेतील लोकांची थट्टा करीत आहेत, अशी टिका सखाराम पेडणेकर यां?नी केली आहे.









