ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आलेले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जनग रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रात त्यांनी भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र यावे असे म्हटले आहे. तसेच भाजप सरकारने सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या विरोधात वापर सुरू केला आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळेच ईडीने केवळ टीएमसी नव्हे तर डीएमकेसहीत अन्य पक्षांच्या नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे, असे सांगतानाच आता लोकशाही आणि संविधानावरील भाजपचे आक्रमण परतवून लावण्यासाटी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहेे, असेही ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केले आहे.