त्या दिवशी रात्री उशिराच फोन वाजला. हॅलो… हॅलो.. मी नेहा बोलते आहे. ओळखलं का? हो..हो..बोल ना..आज एवढय़ा उशिरा फोन? हो अगं.. काही केल्या चैनच पडत नव्हतं. कशातच चित्त नाही हल्ली. का गं..काय झालं?
तसं काही विशेष नाही परंतु हल्ली खूप उदास वाटत आहे. कशातच लक्ष लागत नाही. वर्क
फ्रॉम होम सुरू आहे, बाकी रुटिनही चालू आहे पण हल्ली थकल्यासारखंच होतं गं. एखादा दिवस काहीही काम नसले तरीही दमणूक झाल्यासारखी वाटते.
बरं…काही कौटुंबिक समस्या? नाही. तसं काहीच नाही. घरी सगळे व्यवस्थित आहे. घरचे वातावरण चांगले आहे. आर्थिक स्थिती उत्तम आहे. सगळय़ा टेस्टही केल्या पण रिपोर्ट नॉर्मल आहेत. बरं..
काहीवेळा चिडचिड होते. एकेकदा कंटाळाच येतो. पुस्तक वाचायला घेतलं तरी लक्ष लागत नाही. काय कळत नाही गं. बरं काय होतं नेमकं तेही सांगता येत नाही. परवा घरी असेच बोलून पाहुया म्हणून सहजच दुसऱया कुणाचं उदाहरण देत हे सगळं सांगितलं.. माझे सासरे पटकन् म्हणाले.. कसलं काय गं.. एकेकांना सुख बोचतं.. कसली उदासी नी काय… डोक्मयाची कामं करणाऱयांचे हे फॅडच झालं आहे हल्ली.. कसल्या झोपा उडतात तरुणपणी देव जाणे.. श्रमजीवी माणसे पहा म्हणावं. त्यांना असले विचार करायला वेळ नसतो. सगळी सुखं दाराशी हात जोडून उभी असली ना की, हे असं होतं. काहीतरी हवं ना. मी शांतच बसले एकदम. कधी कधी वाटतं खरंच तसं असेल का? असेल तर माझ्याबाबतीतही हेच असेल का?की हे अस्वस्थ वाटणं वेगळं काही आहे? पण तसं खरंच असेल तर असे का?हजार प्रश्न मनात आले.
मला काही सुचेना म्हणून फोन केला. ठीक आहे. नेहाशी बराच वेळ बोलणं झालं.. असं का होतं यावर सविस्तर चर्चा झाली. ती यामधून नक्कीच सहजतेने बाहेर पडू शकते असा विश्वास देत दुसऱया दिवसापासून टप्प्याटप्याने सजगतेची काही तंत्र, त्याचा सराव सुरू झाला. दोन महिन्यातच तिला खूप फरक जाणवू लागला. ती यातून बाहेरही पडली.
मुळातच शरीरासारखं मन ही आजारी पडतं हे आजही पटकन् स्वीकारलं जात नाही. ही जाणीव नसेल आणि प्राथमिक टप्प्यात त्यासाठी काही केलं गेलं नाही तर मग फ्रस्टेशनच्या उंबरठय़ावरून डिप्रेशनच्या गर्तेत अडकायला वेळ लागत नाही.
सतत सुरू असलेले ‘विचाराचे रवंथ’ सुरूच राहते आणि दमणूक जाणवू लागते.
विचार करणे हे आपल्या मेंदूचे कामच आहे परंतु मेंदूतील ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’ हा भाग सतत काम करत राहिला तर मेंदू थकतो. शारीरिक श्रम नसले तरी थकवा जाणवण्याचे बऱयाचवेळा हेही एक कारण असू शकते.
आपण काहीही काम न करता बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करत असतो त्याला शास्त्रज्ञांनी डिफॉल्ट मोड नेटवर्क असे नाव दिले. खरंतर संगणक युगातील बऱयाच जणांना ‘डिफॉल्ट मोड’ हा शब्द संगणकाच्या बाबतीत सुपरिचित असाच आहे. त्यामधे डिफॉल्ट मोड असतो. संगणक सुरू केला की त्याच स्थितीत सुरू होतो. तसेच आपला सुपरकॉम्प्युटर अर्थात मेंदू! झोपेमधून जागे होताक्षणी मेंदूतील हा भाग लगेच आपले काम सुरू करतो. जाग येताक्षणी लगेच आपल्या विचारांना सुरुवात होते. अर्थात झोपेतही ज्यावेळी हा भाग सक्रिय असतो त्यावळी आपल्याला स्वप्न पडतात. आधुनिक संशोधनानुसार मेंदूतील या भागामुळे आपण अमूर्त विचार करू शकतो. याच्या सक्रियतेमुळेच आपल्याला विविध कल्पना सुचतात. क्रिएटीव्हिटीसाठी या भागाचे सक्रिय असणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु या भागाला अजिबातच विश्रांती नसेल किंवा ओव्हर ऍक्टिव्ह डिफॉल्ट मोड नेटवर्क
हे अस्वस्थता, चिंता, नैराश्य, निद्रानाश याचे मुख्य कारण असू शकते.
ओव्हर ऍक्टिव्ह डिफॉल्ट मोडमुळे एकाग्रता साधण्यातही अडथळा येतो. नीट लक्ष देता न आल्याने त्या कृतीचा आनंद घेता येत नाही. आकलन होण्यावरही त्याचा परिणाम होतो. उदा. आता तुम्ही हा लेख वाचता आहात परंतु डिफॉल्ट नेटवर्कच्या अति सक्रियतेमुळे तीन चार ओळी वाचताक्षणी मन दुसरीकडे भरकटेल, वेगवेगळे विचार येतील, नीट वाचले जाणार नाही आणि लक्ष केंद्रीत न करता आल्याने लिहिलेल्या विषयाचे आकलनही होणार नाही. म्हणजेच लक्ष देण्याची क्षमता पर्यायाने आकलन यावरही याचा परिणाम होतो. तसेच मेंदूच्या या भागाला विश्रांती न देताच सतत त्या भागाला काम देत असू तर साहजिकच ताण, थकवा जाणवू लागेल. म्हणूनच अधेमधे या भागाला विश्रांती देणे गरजेचे आहे.
ज्यावेळी आपण लक्षपूर्वक, सजगतेने काही हालचाली करतो त्यावेळी आपल्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम मिळतो. डिफॉल्ट मोड नेटवर्क मोड नेटवर्कसारखाच अजून दुसरा भाग आपल्या मेंदूत कार्यरत असतो त्याला ‘टास्क पॉझीटिव्ह नेटवर्क’ (TPN) असे म्हटले जाते. परंतु हे दोनही भाग एकाच वेळी सक्रिय होऊ शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा ‘टास्क पॉझीटिव्ह नेटवर्क’ हा भाग ज्यावेळी सक्रिय होतो त्यावेळी ‘डिफाल्ट मोड नेटवर्क’ला आराम मिळतो. आपण जेव्हा एखादी कृती लक्षपूर्वक करत असतो, शारीरिक हालचाली करतो त्यावेळी टास्क पॉझीटिव्ह नेटवर्क हा भाग सक्रिय होत असतो. अर्थात वेगवेगळय़ा टास्कसाठी हे नेटवर्क वेगवेगळे असते.
श्रमजीवी लोक, ज्यांचे शारीरिक श्रम अधिक असतात. त्यांना ती कृती लक्षपूर्वक करावी लागते उदा. समजा कुदळ घेऊन काही खणण्याचे काम सुरू आहे तर ते लक्ष देउन करावे लागेल. लक्ष नसेल तर कुदळ पायाला लागेल. शारिरिक हालचाल लक्षपूर्वक झाल्याने टास्क पॉझीटिव्ह नेटवर्क सक्रिय होते आणि साहजिकच डिफॉल्ट मोड’ला आराम मिळतो. म्हणजेच यांत्रिकतेने कृती केली गेली तर डिफॉल्ट मोडला आराम मिळत नाही. पूर्वी ज्यावेळी श्रमाची कामे केली जायची त्यावेळी तिथेच लक्ष द्यावे लागायचे उदा. विहिरीतून हातरहाटाने पाणी काढताना लक्ष जाणीवपूर्वक कृतीवरच द्यायला लागायचे परंतु आता पाणी टाकीत नेण्याचे काम पंप करतो आणि टाकी भरते का पहात असताना आपले विचारांचे बटण मात्र ऑनच राहते. विचारचक्र सुरूच राहते आणि आपला मेंदू थकतो.
मानवाने खूप प्रगती केली. आपल्या बुद्धीच्या बळावर विविध शोध लावले. भौतिक सुख सुविधांनी युक्त असे जीवन आपण जगू लागलो. अर्थात उपलब्ध आधुनिक साधनांचा लाभ हा घ्यायला हवा परंतु तो घेत असताना या गोष्टींचेही भान हवे. तसेच बौद्धिक कामे करत असतानाही डिफॉल्ट मोडला आराम देणेही गरजेचे आहे. डिफॉल्ट मोड नेटवर्कची अति सक्रियता किंवा त्याला अजिबात आराम न देण्यामुळेच श्रमजीवी वर्गाच्या तुलनेत बुद्धिजीवी वर्गामध्ये ताणतणाव, चिंता, अस्वस्थता, नैराश्य याचे प्रमाण तुलनेने अधिक दिसते.
माईंडफुलनेस अर्थात सजगतेच्या तंत्रानी डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम देता येतो. ब्रेथ अवेअरनेसने ते शक्मय होऊ शकते. नैसर्गिक श्वसनामुळ होणारी छाती आणि पोटाची हालचाल जाणत, श्वास जाणण्याचा सराव केला तर त्यावेळी आपल्या मेंदूतील इन्सुला हा भाग कार्यरत होतो आणि डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम मिळतो. दरतासातील एक मिनिट श्वासाची हालचाल जाणण्यासाठी दिले तरी ते खूप उपयुक्त ठरेल. याविषयी जाणून घेऊया, पुढच्या भागात..
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








