प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र बुधवारी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा झाला असून, वॉर्ड क्र. 4 व 7 करिता प्रत्येकी एकप्रमाणे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी विविध कागदपत्रांची जोडणी करावी लागत असल्याने धावपळ सुरू आहे.
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता सोमवारी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. गेल्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रतिसाद लाभला नाही. मात्र बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध कागदपत्रे जोडावी लागत आहेत. तसेच सहा सूचकांची नावे तसेच आवश्यक माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आतापर्यंत 600 हून अधिक अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशील, 6 सूचक, प्रतिज्ञापत्रक, तसेच नो डय़ूज सर्टिफिकेट अशी कागदपत्रे जोडण्याकरिता इच्छुकांना कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. मात्र बुधवार दि. 18 रोजी दोन अर्ज दाखल झाले आहेत. वॉर्ड क्र. 4 मधून माजी नगरसेवक रमेश कळसण्णावर आणि वॉर्ड क्र. 7 मधून शंकर पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपासून अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्मयता आहे.
बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त
शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचे उल्लंघन होण्याची शक्मयता आहे. पोलीस प्रशासनाने निवडणूक कार्यालयाच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कार्यालयात जाण्यासाठी सूचक आणि उमेदवारांना परवानगी देण्यात येत आहे. गोवावेस येथील व्यापारी संकुलाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. अर्ज भरताना गर्दी होऊ नये, याकरिता बंदोबस्त असल्याची माहिती समजल्यानंतर गैरसमज दूर झाला. प्रत्येक निवडणूक कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेड्स लावून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.