प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने सरकारी कार्यालये सुरू करून कामकाज करण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. विविध कामांसाठी नागरिक महापालिका कार्यालयाकडे येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली असून प्रत्येकाची थर्मल चाचणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने महापालिका कार्यालय गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. सरकारी कार्यालये सुरू करण्यात आल्याने नागरिकांची ये-जा महापालिकेकडे सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाबाबत विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी मनपाच्या कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज अद्याप सुरू नाही. पण विविध अर्ज देण्याकरिता व अन्य कामाकरिता नागरिक कार्यालयात येत आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून कार्यालयात येणाऱया प्रत्येकाची थर्मल चाचणी करण्यात येत आहे. याकरिता कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिपायाची नियुक्ती करून थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे चाचणी करण्यात येत आहे. या ठिकाणी अधिकाऱयांसह सर्वच नागरिकांची तपासणी केली जात आहे.









