प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालय आवारात संसदेच्या प्रतिकृतीतील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे उद्घाटन रखडले होते. अखेर प्रशासकीय आयनॉक्स इमारतीच्या उद्घाटनासाठी मनपाला मुहूर्त मिळाला असून मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
शहराची व्याप्ती वाढत असल्याने कार्यालयाचा पसारा वाढत आहे. महापालिका कार्यालयाची नवीन इमारत 2006 मध्ये सुभाषनगर येथे उभारण्यात आली होती. मात्र सदर इमारतीला गळती लागली असून इमारत अपुरी पडू लागली आहे. यामुळे नव्याने इमारतीचे बांधकाम करून इमारतीचा विस्तार केला आहे. महापालिका कार्यालय इमारतीचे बांधकाम करून तेरा वर्षे झाली. मुख्य कार्यालयाच्या या इमारतीमध्ये विविध विभागाचे कामकाज स्थलांतर करण्यात आले आहे. भव्य इमारत असूनही कार्यालयातील अधिकाऱयांना आणि कर्मचाऱयांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. यामुळे गैरसोय होत आहे.
संसदेच्या प्रतिकृतीकरिता 1 कोटी 91 लाखाच्या निधीची तरतूद केली आहे. मनपा कार्यालय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. यामुळे पुतळय़ाच्या मागील बाजूस संसदेची प्रतिकृती तयार करून इमारत उभारली आहे. इमारतीचे बांधकाम व सुशोभिकरणाचे काम पूर्ण होवून सहा महिने उलटले, पण कोरोनामुळे इमारतीचे उद्घाटन रखडले होते. यापूर्वी उद्घाटन करण्याच्यादृष्टीने तयारी करण्यात आली होती. पण मुहूर्त मिळाला नसल्याने रखडले होते. अखेर मंगळवार दि. 21 रोजीचा मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि नगरविकासमंत्री बी. ए. बसवराज बैरती व अधिकाऱयांच्या उपस्थितीत या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.









