वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशात काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. छतरपूर जिल्हय़ाच्या बडा मलहरा मतदारसंघाचे आमदार प्रद्युम्न सिंग लोधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. लोधी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
लोधी यांच्या मागोमाग काँग्रेसचे आणखी अनेक आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोधी यांनी माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. लोधी यांनी शिवराज सिंग यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला आहे. लोधी यांना आता मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुंदेलखंड तसेच लोधी समुदायाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची मागणी उमा भारती यांनी केली होती.
भाजपकडून सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे लोधी म्हणाले.









