प्रतिनिधी / सातारा :
आग्या मोहोळला दगड मारल्याने मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हिरापूर, नुने फाटा येथे ही घटना घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, हिरापूर येथे संजय रामा जाधव (वय 7 रा. हिरापूर, मूळ रा. पेन ता. माणगाव) हा त्यांच्या दोन मित्रासोबत हिरापूर येथील रानात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांना एका झाडावर आग्या मोहोळ दिसले. तिघेही आग्या मोहोळच्या दिशेने दगड भिरकावू लागले. त्यातील एक दगड आग्या मोहोळला लागला. दगड लागल्याने मधमाशांनी चिमुकल्यांवर हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिघेही मुले भांबावून गेली. व त्यांनी आरडाओरडा करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्ला केल्यानंतरही सुदैवाने तिघेजण घरी पोहोचले. मात्र, सर्वात जास्त मधमाशा संजय याला चावल्याने तो अत्यवस्थ होता. त्यांच्या अंगावर सूज येऊ लागली. त्यामुळे संजयला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्रभर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र पहाटे साडेसहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.









