चितारआळी गणेशोत्सव मंडळाचा आदर्शवत उपक्रम
वार्ताहर / न्हावेली:
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात धान्य वाटप, सॅनिटायझर वाटप, आरोग्य सुविधा आदी परवित असताना सावंतवाडी येथील चितारआळी गणेशोत्सव मंडळाने आरोस कोंडुरा येथील मतिमंद मुलांच्या शाळेसाठी स्वखर्चाने विंधन विहीर खोदून देत एक आगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला.
यासाठी गणेशोत्सव मंडळ, चितारआळीचे पदाधिकारी मंदार नार्वेकर यांनी पुढाकार घेतला. या विंधन विहिरीला पाणीही भरपूर मिळाल्याने सर्वांनाच आनंद झाला. या शाळेत पाण्याची सोय व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी मंदार नार्वेकर यांचे लक्ष वेधले होते. नार्वेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी अशोक गुप्ता, योगेश सुराणा, गजानन चितारी, भाई काणेकर, राघू चितारी, बाबल वाडकर, शेखर तेंडुलकर, उदय चितारी, राजेश काणेकर, गौरव दळवी, चेतन चिंदरकर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱयांनी मोलाचे सहकार्य केले.
आरोस कोंडुरा येथे मतिमंद मुलांची ही निवासी शाळा असून दात्यांच्या माध्यमातून ही मुले इथे चांगल्या दर्जाचे शिशण घेत आहेत. या शाळेच्या इमारतीसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मोठे योगदान राहिले आहे. या शाळेला विंधन विहिरीची सुविधा देऊन चितारआळी गणेशोत्सव मंडळाने एक अनोखा आदर्श घालून दिल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.









