फातोर्डाः मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स पतसंस्थेच्या पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन बाबाजी सावंत. बाजूला सचिव संदीप रेडकर, खजिनदार लॉरेन्सिया वाझ, सरिता फर्नांडिस व जुझे परेरा.
प्रतिनिधी / फातोर्डा
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटी या पतसंस्थेने आपल्या सभासदांसाठी आकर्षक अशी वाहन कर्ज योजना जाहीर केली आहे. या संबंधी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती पतसंस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत यांनी दिली. यावेळी पतसंस्थेचे सचिव संदीप रेडकर, खजिनदार लॉरेन्सिया वाझ तसेच सरिता फर्नांडिस व जुझे परेरा हे संचालक उपस्थित होते.
41 वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटीच्या सदस्यांची कैक वर्षांची वाहन (दुचाकी आणि चारचाकी) कर्ज वितरणाची मागणी पतसंस्थेने पूर्ण केल्याचे बाबाजी सावंत यावेळी म्हणाले. वाहन कर्जासाठी 8 टक्के व्याज दर आहे. आम्ही कर्जधारकांना वर्षाच्या अखेरीस नफ्यातून पॅट्रोनेजद्वारे 0.3 ते 0.4 टक्के परतावा करतो. त्यामुळे 8 टक्क्याहून कमी व्याजदर वाहन कर्ज घेण्याऱयांना मिळणार असल्याचे बाबाजी सावंत यावेळी म्हणाले.
‘अ‘ दर्जाप्राप्त मानांकन आणि शून्य एनपीए असलेल्या या पतसंस्थेत 2000 हून अधिक सभासद असून भाग भांडवल 2,65,83,202 आहे. आमच्याकडे कायम ठेव 28 कोटी असून सभासदांना आतापर्यंत 26 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आल्याचे सावंत म्हणाले. फक्त 36 सभासदांनी 3600 भाग भांडवलने सुरूवात केलेल्या या पतसंस्थेने आता गरूडभरारी घेतली असून यात सभासदांचा मोलाचा वाटा आहे. मागील 40 वर्षे मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटीच्या संचालक मंडळातील पदाधिकाऱयांनी केलेले कार्य मोलाचे आहे. आमचे माजी चेअरमन किसन फडते यांनी या संस्थेचे चेअरमनपद कित्येक वर्षे सांभाळले. त्यांनी तसेच त्यांच्या कार्यकारी मंडळाने या पतसंस्थेला दिलेले योगदान निस्वार्थी आणि न विसरण्यासारखे असल्याचे यावेळी चेअरमन बाबाजी सावंत म्हणाले.
पतसंस्थेचे विस्तार काऊंटर मुरगाव आणि कुडचडेत
मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटीचा सध्या विस्तारीत काऊंटर काणकोणात चावडीवर आहे. यामुळे तेथील सुमारे 25 शाळा आणि कॉलेजच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांची मागणी पूर्ण झाली आहे. आता मुरगाव आणि केपे तालुक्यात पतसंस्थेच्या सदस्यांची संख्या वाढल्याने आम्ही वास्को आणि कुडचडे किंवा केपेत काऊंटर उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाबाजी सावंत म्हणाले. यासाठी आवश्यक पत्रव्यवहार रजिस्ट्रार ऑफ कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीकडे लवकरच करण्यात येणार असून यामुळे केपे आणि मुरगाव तालुक्यातील आमच्या सदस्यांची चांगली सोय होणार असल्याचे बाबाजी सावंत म्हणाले.
15 लाखापर्यंत कर्जाची मर्यादा करण्यासाठी पतसंस्था प्रयत्नशील
मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटीची सध्याची कर्ज मर्यादा 10 लाखापर्यंत आहे. ती आता 15 लाखापर्यंत करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असून तसा प्रस्तावही आम्ही सबंधित कार्यालयात पाठविला आहे. आम्ही आता व्याज दर 10.5 टक्यांहून 9.5 टक्यावर आणला आहे. भागधारकांसाठी तो भविष्यात आणखीही कमी करण्याचा विचार आहे. गृहबांधणीसाठी आम्ही 9 टक्क्याच्या व्याजदराने 25 लाखपर्यंत कर्ज देतो तसेच आमच्या पथसंस्थेत रिकरींग डिपोझिट्स आणि फिक्सड् डिपोझिट्स ही योजना असून यात आम्ही अन्य राष्ट्रीय बँक आणि पतसंस्थेपेक्षा चांगले रिटर्न्स भागधारकांना देत असल्याचे बाबाजी सावंत म्हणाले.
डॉ. संजय सावंत देसाई, प्रा. एफ. एम. नदाफ यांचे अभिनंदन
दरम्यान, मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ओपरेटीव्ह पेडीट सोसायटीने त्यांचे संचालक आणि कुंकळळीतील सीईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत देसाई यांना तसेच पतसंस्थेचे सदस्य प्रा. एफ. एम. नदाफ यांना शासनाचा प्रतिष्ठतेचा कॉलेज विभागातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. चेअरमन बाबाजी सावंत यांनी तसेच उपस्थित संचालक मंडळातील सदस्यांनी या दोघांचेही अभिनंदन केले.









