भाजपने फातोडर्य़ात खाते खोलले : पती-पत्नी पुन्हा पालिकेत,पत्नीचा विजय पाहण्यापूर्वीच पती गेला

प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिकेवर पुन्हा एकदा गोवा फॉरवर्ड-काँग्रेस पक्षाच्या युतीला निर्विवाद सत्ता मिळाली. 25 पैकी 17 जागा जिंकल्या. भाजपने फातोडर्य़ात आपले खाते खोलले तर सदानंद नाईक व बिबिता नाईक या पती-पत्नीने पुन्हा एकदा मडगाव पालिकेत दमदार पाऊल ठेवले. तर मडगाव पालिकेच्या प्रभाग 20 मध्ये मॉडेल मडगाव पॅनलच्या उमेदवार सेंण्ड्रा फर्नांडिस या काल विजयी झाल्या खऱया पण, आपल्या पत्नीचा विजय पाहण्यासाठी त्याचे पती मॅथ्यू फर्नांडिस हे मात्र हयात राहिले नाही. काल रविवारी सकाळी कोरोनामुळे त्यांचा बळी गेला होता.

काल मतमोजणीला प्रारंभ होताच गोवा फॉरवर्डने विजयी घोडदौड सुरू केली. पहिल्या सलग पाच प्रभागात गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर निकालात कलाटणी मिळताना प्रभाग 6, 7 व 8 मध्ये भाजपने आपले खाते खोलले. त्यामुळे निकालाची उत्कंठा कमालीची वाढली. फातोडर्य़ातील हे तीन प्रभाग सोडल्यास पुन्हा गोवा फॉरवर्डने आपले वर्चस्व सिद्ध केले. यात भाजप पुरस्कृत व्हायब्रंट मडगावच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मडगाव पालिकेच्या माजी नगराध्यक्ष पूजा नाईक, माजी नगरसेवक लिंण्डन परेरा, राजू नाईक हे पुन्हा निवडून आले आहेत.

गेल्या पालिका निवडणुकीत गोवा फॉरवर्डने फातोडर्य़ातील अकरा पैकी अकरा प्रभागात विजय मिळविला होता. मात्र, यावेळी भाजपने तीन प्रभागात विजय मिळविताना गोवा फॉरवर्डची घोडदौड काही प्रमाणात रोखली. प्रभाग 2 मध्ये तर व्हायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार कालिदास नाईक यांचा अवघ्या 10 मतांनी पराभव झाला.

मडगाव मतदारसंघातील बारा प्रभागापैकी काँग्रेस पुरस्कृत मॉडेल मडगाव पॅनलमधील आठ नगरसेवक विजयी झाले. तर भाजप पुरस्कृत व्हायब्रंट मडगाव पॅनलचे दोनच नगरसेवक विजयी झाले. तर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे खंदे समर्थक असलेले महेश आमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. ते विजयी झाले. त्यांनी मॉडेल मडगावचे मनोज मसूरकर यांचा पराभव केला. प्रभाग 12 मध्ये भाजपचे शर्मद पै रायतूरकर यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव झाला. त्यांनी दोन वेळा फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र, निकालात काही बदल झाला नाही.

प्रभाग 13 मध्ये माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांनी आपल्या बहिणीला उभे केले होते. त्यांनी दोन वेळा नगरसेवक झालेल्या डॉरीस टक्सेरा यांचा पराभव केला. माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम प्रभू शिरोडकर हे पुन्हा विजयी झाले आहेत. मडगाव पालिकेच्या प्रभाग 17 मध्ये भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागातून मॉडेल मडगावचे तरूण उमेदवार सिद्धांत गडेकर हे विजयी झाले. हा निकाल धक्कादायक मानला जातो.
दिगंबर कामत यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले
मडगाव मतदारसंघात दिगंबर कामत यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना 11 पैकी 8 प्रभागातून आपले उमेदवार निवडून आणले. भाजपला त्यांनी दोन प्रभागावरच रोखले. तर एका अपक्षाने बाजी मारली.
मडगाव नगरपालिकेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रभाग 1 – जॉनेस फ्रान्सिस आग्नेला (728 विजयी), मिलाग्रीस फर्नांडिस (399). प्रभाग : 2 – क्रास्टो जुवाव निक्लांव (988 विजयी), कालिदास चंद्रकांत नाईक (978). प्रभाग : 3 – परेरा लिंण्डन (704 विजयी), झिको फर्नांडिस (546). प्रभाग : 4 – पूजा नाईक (1269 विजयी), पुष्पा विर्डीकर (460), प्रभाग : 5 – श्वेता सूजय लोटलीकर (1038 विजयी), दीपश्री कुर्डीकर (616). प्रभाग : 6 – सदानंद नाईक (765 विजयी), प्रवीण नाईक (515), प्रभाग : 7 – मिलाग्रीना गोम्स (691 विजयी), कुस्तोदियो डायस (638). प्रभाग : 8 – कामिलो बार्रेटो (886 विजयी), मिलाग्र नोरोन्हा (636), प्रभाग : 9 – रवींद्र नाईक (836 विजयी), नर्मदा कुंडईकर (616). प्रभाग : 10 – व्हिक्टोरीना तावारीस (859 विजयी), वासुदेव कुंडईकर (523), प्रभाग : 11 – राजू नाईक (477 विजयी), राजीव रावणे (395).
प्रभाग : 12 – सगूण नाईक (678 विजयी), शर्मद पै रायतूरकर (667). प्रभाग : 13 – डॉ. सुशांता कुरतरकर (751 विजयी), डॉरीस टेक्सेरा (531), प्रभाग : 14 – रोनिता राजेंद्र आजगांवकर (659 विजयी), सुलक्षा जामूनी (580). प्रभाग : 15 – दिपाली सावळ (1863 विजयी), अनिशा नाईक (373). प्रभाग : 16 – महेश आमोणकर (843 विजयी), मनोज मसूरकर (515). प्रभाग : 17 – सिद्धांत गडेकर (777 विजयी), देविका कारापूरकर (635). प्रभाग : 18 – घनश्याम प्रभू शिरोडकर (1105 विजयी), पराग रायकर (223). प्रभाग : 19 – लता पेडणेकर (791 विजयी), मंगला हरमलकर (439). प्रभाग : 20 – सेंण्ड्रा जॉन फर्नांडिस (739 विजयी), शमिन बानो (684). प्रभाग : 21 – दामोदर शिरोडकर (1016 विजयी), सचिन सातार्डेकर (407). प्रभाग : 22 – दामोदर वरक (862 विजयी), सुनील कृष्णनाथ नाईक (513).
प्रभाग : 23 – निमेसा फालेरो (774 विजयी), व्हिव्हियाना कार्दोज (623). प्रभाग : 24 – पार्वती पराडकर (448 विजयी), राजू उर्फ हॅडली शिरोडकर (318). प्रभाग : 25 – बबिता सदानंद नाईक (978 विजयी), अश्मा बी (893).









