शॅडो कौन्सिलच्या सावियो कुतिन्होंकडून संताप व्यक्त : विद्यार्थ्यांना महागात पडू शकतो विलंब
प्रतिनिधी/मडगाव
आमच्या निदर्शनास आले आहे की, काही कारणांस्तव उत्पन्नाचा दाखला जारी करण्यात मडगाव पालिकेकडून अवास्तव विलंब होत आहे. यामुळे अर्जदारांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे, असे शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची हीच वेळ आहे. हे लक्षात घेता कोणताही अवाजवी विलंब विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महागात पडू शकतो, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
शॅडो कौन्सिलच्या असे नजरेस आणण्यात आले आहे की, अशा अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी काही अधिकाऱयांनी स्वतः वेळ निश्चित केली आहे आणि या स्वतः लागू केलेल्या वेळेनुसार, ते संध्याकाळच्या सत्रात अर्ज-दाखल्यांवर स्वाक्षरी करण्याचे टाळतात. शिवाय, काही अधिकाऱयांकडे इतर पालिकांमध्ये दुहेरी कार्यभार आहे. यामुळे सामान्य लोकांची गैरसोय होत आहे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. विशेषतः विद्यार्थी समुदाय आणि त्यांचे पालक यांनी आपल्याकडे संताप व्यक्त केला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
कुतिन्हो यांनी मुख्याधिकारी रोहित कदम यांना विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि अर्जदारांना आवश्यक उत्पन्नाचे दाखले कमीत कमी वेळेत जारी केले जातील याची खात्री करावी. जरी संबंधित कर्मचारी गैरहजर असला, तरी अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत लिंक असावी आणि एखाद्या अधिकाऱयाची अनुपस्थिती हे अर्जांच्या प्रक्रियेला ब्रेक लागण्याचे कारण बनू नये, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.









