प्रतिनिधी/ मडगाव
सुवर्णलंकाराची चोरी करण्याच्या उद्देशाने मडगावचे सराफ स्वप्निल वाळके यांच्या खुनाची घटना मडगावात ताजी असतानाच चोरटय़ांनी मडगावातील ‘शीश महल’ इमारत फोडली. मडगाव पोलीस स्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या ‘शीश महल’ या इमारतीतील 5 डॉक्टरांचे क्लिनीक व एका बिल्डरच्या कार्यालयात चोरी करण्यात आली आहे. या अनेक चोऱयांत नेमकी किती रक्कम पळविण्यात आली याचा निश्चित आकडा प्राप्त झालेला नसला तरी हा आकडा लाखाच्या घरात असावा असा अंदाज आहे.
‘शीश महल’ इमारतीत मडगावच्या माजी नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांचे निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे त्यांचे क्लिनिक आहे. डॉ. बबिता आंगले यांच्या व्यतिरिक्त डॉ. मर्विन आल्बर्टो, डॉ. सिद्धेश तळावलीकर, डॉ. पूजा तळावलीकर व डॉ. राजेश कांबळी यांची क्लिनिक आहेत. या सर्व क्लिनिकमध्ये चोऱया करण्यात आल्या आहेत.
सर्वप्रथम बिल्डरच्या लक्षात आली चोरी
‘शीश महल’ इमारतीतील इतकी आस्थापने फोडण्यात आल्याचे सर्वप्रथम बोर्डा मडगाव येथे राहणारे आणि या इमारतीत कार्यालय असलेल्या ग्लेन आंतोनियो आंद्राद (50) यांना आढळून आले. व्यवसायाने बिल्डर असलेले आंद्राद यांचे कार्यालय ‘शीश महल’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. शनिवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता आपले कार्यालय बंद करुन ते घरी गेले होते. रविवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते आपल्या कार्यालयात आले असता त्यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. आत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयाची पाहणी केली तेव्हा कार्यालयातील कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. याच कपाटात तिजोरी होती. ती तिजेरी उघडी असल्याचे त्यांना आढळून आले. या तिजोरीत रोकड ठेवलेली होती. ती रोकड गायब झाली होती. या तिजोरीत निश्चित किती रक्कम होती हे पोलिसांना लगेचच समजू शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनेक डॉक्टरांची क्लिनिक्स होती चोरीचे ‘टार्गेट’
आंद्राद यांनी सहज म्हणून शेजारी असलेल्या दुसऱया एका आस्थापनाकडे नजर टाकली तेव्हा डॉ. मार्वीन आल्बर्टो यांच्या क्लिनिकच्या दरवाजाला लावलेले कुलूपही तोडलेले असल्याचे त्यांना आढळून आले. डेंटल सर्जन डॉ. पूजा तळावलीकर यांच्या क्लिनिकच्या दरवाजाचे कुलूपही तोडलेले होते. जनरल सर्जन डॉ. राजेश कांबळी यांच्या क्लिनिकच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. याच ‘शीश महल’च्या दुसऱया मजल्यावर डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांचे क्लिनिक आहे. त्यांच्या क्लिनिकच्या दरवाजाचेही कुलूप तोडलेले असल्याचे आढळून आल्यानंतर या सर्व आस्थापनांच्या मालकांना झालेल्या प्रकाराची कल्पना देण्यात आली. त्यानंतर त्या त्या आस्थापनांचे मालक तेथे आले.
रोकडीसह सीसीटीव्ही डिव्हिआर बॉक्स लंपास
डॉ. सिद्धेश तळावलीकर यांनी आपल्या क्लिनिकची पाहणी केली तेव्हा त्याना चोरटे खिडकीतून आलेले असल्याचे आढळून आले. त्यांच्या क्लिनिकमधून चोरटय़ांनी रोख 20 हजार रुपये आणि 8,000 रुपये किंमतीचे सीसीटीव्ही डीव्हीआर बॉक्स चोरलेले असल्याचे आढळून आले.
डॉ. बबिता आंगले यांच्या 3, 4 व 5 क्रमांकाच्या दुसऱया मजल्यावरील पॅथॉलोजीकल लॅबमधून रोख 40,000 रुपये व 8,000 रुपये किंमतीचे सीसीटीव्ही डीव्हीआर बॉक्स चोरलेले असल्याचे आढळून आले. डॉ. मर्विन आल्बर्टो, डॉ. पूजा तळावलीकर तसेच डॉ. राजेश कांबळी यांच्या क्लिनिकमधून किती ऐवज लंपास करण्यात आला त्याची माहिती मिळू शकली नाही. त्याचप्रमाणे बिल्डरच्या तिजोरीतून नेमकी किती रककम लंपास करण्यात आली तेही लगेचच समजू शकलेले नाही.









