प्रतिनिधी/ फातोर्डा
कोकणी भाषा मंडळाच्या 25 व्या गोवा युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शुक्रवार 17 ते रविवार 19 या दिवसांत रवींद्र भवन, मडगाव येथे होणार असलेल्या या महोत्सवातील 17 स्पर्धामध्ये यंदा महाविद्यालये व संस्था मिळून 39 गटांतून 2000 ते 2500 युवक-युवती भाग घेतील, असे मडगावात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
धेंपे उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका पल्लवी धेंपे या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा असून वल्लभ बर्वे कार्याध्यक्ष आहेत. महोत्सवाचे उद्घाटन 17 रोजी दुपारी 12.30 वा. प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून टाटा ऑटोकॉम्प सिस्टम लि., मुंबई यांचे अध्यक्ष प्रवीण काडले, तर खास अतिथी म्हणून मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक आणि कला व सांस्कृतिक खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर उपस्थित असतील.
बक्षिसवितरण समारंभ 19 रोजी संध्याकाळी 5 वा. होणार असून यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर मायन्स्केप आस्थापनाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा तारकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्षा रत्नमाला दिवकर, वल्लभ बर्वे, पलाश अग्नी, ऋषिकेश कदम व अन्वेषा सिंगबाळ उपस्थित होत्या.
महोत्सव स्थळाला पर्रीकर यांचे नाव
या महोत्सवाच्या स्थळाला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले असल्याचे बर्वे यांनी सांगितले. तसेच प्रवेशद्वाराला कोकणी अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री स्व. सुरेश आमोणकर यांचे नाव देण्यात आले आहे. माजी मंत्री व कोकणीच्या कार्यकर्त्या स्व. व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे नाव पहिल्या मंचाला, कोकणी कार्यकर्ते प्रशांत म्हार्दोळकर यांचे नाव दुसऱया मंचाला, तर प्रसिद्ध कोकणी लेखक बॉनावेंचर डिपित्रो यांचे नाव तिसऱया मंचाला देण्यात आले आहे. कोकणी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत पालेकर यांचे नाव प्रांगणाला देण्यात आले आहे. भाषातज्ञ शांताराम वर्दे वालावलीकर यांचे नाव पहिल्या दालनाला, प्रसिद्ध कवयित्री नीला तेलंग यांचे नाव दुसऱया दालनाला, तर युवा कलाकार ग्रहेश रायकर यांचे नाव चौकाला दिलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महोत्सवातील विजेत्या संस्थेला 25 हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संस्थेला 20 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या दोन्हीमध्ये शैक्षणिक संस्था नसेल, तर शैक्षणिक संस्थेला आणखी 15 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय महोत्सवातील 17 स्पर्धांच्या प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रत्येकी 3000, 2500 व 2000 अशी पारितोषिके मिळतील. पाच पारितोषिके असलेल्या स्पर्धांसाठी प्रत्येकी 1500 रुपयांचे चौथे पारितोषिक व 1000 रुपयांचे पाचवे पारितोषिक ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिवकर यांनी दिली.









