पालिकेने वाढीव कालावधीसंबंधी स्पष्टीकरण द्यावे : शॅडो कौन्सिलची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने म्हटले आहे की, शुक्रवारी 10 दिवस पूर्ण झालेल्या जुन्या बाजार परिसरातील फेस्ताच्या फेरीला शनिवार आणि रविवारसह एकूण 12 दिवस होणार असून या वाढीचे स्पष्टीकरण पालिकेने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी आजुबाजूच्या रहिवाशांना आणि सामान्य जनतेला होणाऱया त्रासांबद्दल सहानुभूती दाखवू शकले नाहीत ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे. परंतु त्याऐवजी त्यांनी काही एजंटांच्या हिताचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले, असा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.
राजकारण्यांच्या आशीर्वादामुळे काही बेईमान घटकांसाठी ही फेस्ताची फेरी अत्यंत किफायतशीर ठरलेली आहे. शॅडो कौन्सिलचे सदस्य प्रसारमाध्यम प्रतिनिधींना घेऊन या विषयाची माहिती मिळवण्यासाठी शुक्रवारी फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्सवर गेले. शुक्रवारी 10 दिवस उलटून गेले असताना स्टॉलमालकांकडून आम्हाला हे ऐकून धक्का बसला की, पालिकेच्या एकाही अधिकाऱयाने कोणत्याही शुल्क वा भाडय़ाची वसुली केलेली नाही. मात्र, सोपो कंत्राटदाराच्या कामगारांनी स्टॉलमालकांकडून 4 ते 12 हजार रु. इतकी मोठी रक्कम वसूल केली आहे. पहिले सात दिवस स्टॉल्सच्या आकारावर आणि रविवारपर्यंतच्या कालावधीसाठीची रक्कम शेवटच्या दिवशी (12 व्या दिवशी) गोळा केली जाईल, असा कुतिन्हो यांनी दावा केला.
पालिका-सोपो कंत्राटदाराकडून संघटित लूट
या प्रकारामुळे पालिका आणि सोपो कॉन्टेक्टर यांच्यात संघटित लूट सुरू असल्याचे निश्चितपणे दिसून येते. सोपो कंत्राटदाराला स्टॉलमालकांकडून कितीही रक्कम वसूल करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे. पालिकेला कर्मचाऱयांना मासिक पगार देण्यासाठी संघर्ष करावा लागत असला, तरी पालिकेकडून होत असलेल्या लुटमारीला आळा बसलेला नाही, असा दावा आगुस्तीन गामा यांनी केला. पालिकेने फेस्ताच्या फेरीतून कमावलेल्या महसुलाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. फेस्तातील महसूल संकलनाचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्यात पालिका अयशस्वी ठरली, तर भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा व दक्षता विभागासह सक्षम अधिकारिणीसमोर तक्रार करण्याचा इशारा शॅडो कौन्सिलने दिला आहे.
उद्या सायंकाळी फेरी थांबविण्याचे निर्देश : मुख्याधिकारी
दरम्यान, जनतेचा रोष पाहता कर आकारणी विभागाला आज शनिवार आणि उद्या रविवारी काम करण्याचे तसेच फेस्ताच्या फेरीच्या अतिरिक्त 2 दिवसांचे शुल्क वसूल करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली. यावषीच्या फेस्ताच्या फेरीच्या बाबतीत प्रत्येकाने भाडे वसुलीच्या कर्तव्यात कसूर दाखवली आहे. म्हणून मी कर आकारणी विभागाला 19 रोजी संध्याकाळी 6 वा. फेस्ताची फेरी थांबवण्याच निर्देश दिला आहे. त्यात अयशस्वी झाल्यास लेखा आणि कर अधिकारी, मार्केट निरीक्षक आणि संबंधित अन्य अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूण 4 दिवसांचे अतिरिक्त शुल्क गोळा करायचे आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.









