पर्यावरणप्रेमींचे पालिकेला आवाहन : तब्बल 135 झाडे कापण्याचा निर्णय
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील झाडे ही मडगाव शहराची शान आहे. पण, हिच झाडे कापण्याची किंवा त्यांची छाटणी करण्याचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला असून या निर्णयाला आत्ता पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकार एका बाजूने वन महोत्सव साजरा करताना झाडे लावण्याचा संदेश देतात व दुसऱया बाजूने झाडे कापण्याचा निर्णय घेतात हा विरोधाभास नव्हे का असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित करुन मडगावची शान घालवू नका, असे आवाहनही केले आहे.
मडगाव पालिकेने शहरातील तब्बल 135 झाडांवर कुऱहाड चालविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. या झाडांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणप्रेमीं पुढे आलेत आहेत. काल मडगावात या पर्यावरणपेमींची बैठक झाली. त्यात पालिका क्षेत्रातील झाडांची कत्तल करण्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकवेळ छाटणी चालेल, परंतु कापणी नको
मडगाव शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या शहराला वृक्षांची किनार लाभल्याने शहर खुलून दिसते. मात्र, आता पालिकेने 135 झाडांवर कुऱहाड चालविण्याचा निर्णय घेतलाय, हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे मत पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
जर झाडे खरीच धोकादायक असतील तर ती कापण्यास हरकत नाही किंवा त्यांची छाटणी करण्यास पर्यावरणप्रेमींची हरकत नाही. पण, जी झाडे धोकादायक नाहीत अशा झाडांवर कुऱहाड चालू दिली जाणार नाही हे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुन्हा सर्वेक्षण करा
पालिकेने 135 झाडांवर कुऱहाड चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी तो निर्णय अन्यायकारक आहे. या झाडाचे फेर सर्वेक्षण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वन खात्यामार्फत करावे व नंतरच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.









