वार्ताहर / माशेल
लॉकडाऊनमुळे आपल्या राहत्या खोल्यांमध्ये अडकून पडलेले दैनंदिन रोजंदारीवरील मजूर हाताशी काम नसल्याने गावात जाण्यासाठी धडपडत आहेत. अशा मजूरांना काम मिळावे यासाठी सरकारने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात या मजूरांमार्फत गटार व नैसर्गिक नाल्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. ज्यामुळे मजुरांना काम तर मिळाले आहेच, शिवाय त्यांचा वेळही जात आहे.
लॉकडाऊन नंतर फोंडा तालुका व ग्रामीण भागातील झोपडपट्टय़ा व भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया अनेक मजुरांनी गावात जाण्याचा प्रयत्न केला. मोले व इतर चेकनाक्यांवर पोचलेल्या अशा अनेक मजुरांना पकडून आपल्या राहत्या खोल्यामध्ये किंवा सरकारी छावण्यामध्ये ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनचे पहिले चार पाच दिवस जेवणावाचून या मजुरांचे बरेच हाल झाले. काही ठिकाणी घरमालकांनी त्यांना भाडे देण्याची सक्ती करीत खोल्या खाली करण्यास सांगितल्याने प्रचंड दबावाखाली आलेल्या या मजुरांनी गावात जाण्याचा प्रयत्न केला. किराणा मालाची दुकाने बंद असल्याने व भाजी व इतर जीवनावश्यक वस्तू चढय़ा दरात खरेदी कराव्या लागल्याने या मजुरांची बरीच कुचंबणा झाली. काहींनी आपले सामान गुंडाळून पायी चालत जात चेकनाकेही ओलांडण्याचा प्रयत्न केला. हाताशी काम नाही व खर्चाला पैसेही नाहीत अशा बिकट स्थितीत सापडलेल्या मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय सध्या सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरु आहे. आता मान्सूनपूर्व साफसफाईचे काम मिळाल्याने त्यांची चिंता दूर झाली आहे. फोंडा तालुक्यातील विविध पंचायतींमध्ये सध्या या मजुरांकडून गटारांची साफसफाई चालली आहे.