कुली कार्मिक कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
काही ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपंचायतीचा दर्जा घोषित केल्यामुळे मच्छे आणि पिरनवाडी ग्राम पंचायतीच्या निवडणुका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळणे कठीण जाणार आहे. जवळपास 1200 कामगार असून त्यांना काम हवे आहे. तेंव्हा मच्छे व पिरनवाडी ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देवू नये, अशी मागणी ग्रामीण कुली कार्मिक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
केंद्र सरकार रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे राबवत असते. त्यामुळे आम्हाला रोजगार मिळतो. सध्या कोरोनामुळे आम्ही मोठय़ा संकटात आहे. असे असताना मच्छे आणि पिरनवाडी ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची वेळ आली असून तातडीने तो दर्जा रद्द करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुशीला अंबीगेर, वैष्णवी पाटील, परशुराम सदावर, यल्लाप्पा हंचीनमनी, गंगाप्पा मुचंडीकर, रेशमा हंचीनमनी, अनिता मुचंडीकर, लक्ष्मी अनगोळकर यांच्यासह मोठय़ा प्रमाणात महिला उपस्थित होत्या. जिल्हा पंचायतीवरही मोर्चा नेवून तेथेही निवेदन देण्यात आले.









