कळंगुटमधील प्रकार : भात बियाण्याचे वाटप प्रकरण पोलिसांत : परस्परांविरोधात आरोप
प्रतिनिधी / म्हापसा
कळंगूट पंचायतीचे सदस्य सुदेश मयेकर व मंत्री मायकल लोबो यांच्यामध्ये सध्या दुफळी निर्माण झाली असून दोघांनी कळंगुटवर आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. पंचायतीचे गाडी चालक पीटर नोरोन्हा यांनी कळंगूट गावातील शेतकऱयांसाठी आणलेले भात बियाणे परस्पर आपल्या सांगण्यावरून शेतकऱयांच्या घरी पोचते केले, असा आरोप करीत सरपंचानी मंत्र्याच्या सांगण्यावरून खोटी तक्रार दाखल केली व नोरोन्हा याला पोलीस कोठडीत डांबले, अशी माहिती शुक्रवारी मयेकर यांनी कळंगूट पोलीस स्थानकाच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता पंचसदस्य आणि मंत्री यांच्यामध्ये नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
आपण आपल्या गावातील शेतकरी बांधवांना बियाणे आणून दिले होते; मात्र ते एका माणसाला खुपले. त्यांनी आपला काटा काढण्यासाठी पंचायतीच्या चालकास कोठडीत टाकले. त्याने गरीब शेतकऱयांच्या पोटावर न मारता हिंमत असल्यास आपल्याशी सामना करावा. आपण बियाण्यांची 100 पोती शेतकऱयांना दिली होती. मात्र ती पोती घरोघरी पोहोचविणाऱया चालकास कोठडीत टाकल्याने सर्व शेतकऱयांनी ती बियाण्यांची पोती आणून पोलीस स्थानकात टाकली आहेत. गरिबांना त्रास देणाऱयांनी नाहक राजकीय खेळी खेळू नये, असा आरोप कळंगुटचे पंच सदस्य सुदेश मयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
वास्तविक हे प्रकरण घरगुती स्वरुपाचे असल्याने आपापसातही मिटवता आले असते, असे मयेकर यांनी सांगितले. दरम्यान, कोविड महामारीमुळे राज्यात संचारबंदी सुरू असताना घरोघरी बियाण्याचे वाटप करण्याऐवजी त्यासाठी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून खुद्द मंत्री लोबो यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे मयेकर यांनी सांगितले. शुक्रवार दुपारपर्यंत कळंगूट पोलिसांकडून नावनोंदणी न करता नाईकावाडय़ातील शेतकऱयांकडून खतांच्या पिशव्या ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.
गेली दोन वर्षे नावनोंदणी करुनच बियाण्यांचे वाटप
दरम्यान, कळंगूट तसेच परिसरातील शेकडो शेतकऱयांना हरित कळंगूट या कार्यक्रमाखाली स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गेली 2 वर्षे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. स्थानिक शेतकऱयांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बियाणे कळंगूट येथील गोशाळेच्या इमारतीत वेळापत्रकानुसार रितसर नावनोंदणी करूनच स्थानिक शेतकऱयांच्या ताब्यात दिल्या जातात, असे या प्रकल्पाचे कार्यवाह चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले.
पंचायतीच्या तक्रारीनुसार नोरोन्हाला अटक
कळंगूटचे पंच सदस्य सुदेश मयेकर यांनी नावनोंदणी पद्धतीला फाटा देत बियाण्यांच्या पिशव्या परस्पर आपल्या घरी उतरवून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत त्यांना मदत करणाऱया गाडी चालक तसेच पंचायत कर्मचारी पीटर नोरोन्हा यांच्या विरोधात पंचायतीकडून कळंगूट पोलीस तक्रार करण्यात आल्यानंतर संशयित नोरोन्हा यास अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिली.
सरपंच शॉन मार्टिन्स तसेच मंत्री लोबो यांच्याशी कळंगुटमधील केशव सेवा साधनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरवरून मतभेद निर्माण झाल्यानेच आपल्या नाईकावाडा प्रभागातील स्थानिक शेतकऱयांना योग्यवेळी बियाण्यांचे वाटप करण्याच्या उद्देशाने नाव नोंदणीला फाटा देत खतांच्या पिशव्या आपल्या ताब्यात घेतल्या तसेच त्या गरजू शेतकऱयांच्या स्वाधीन केल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र हिटलरशाहीची भूमिका बजावणारे मंत्री मायकल लोबो तसेच त्यांच्या जवळच्या लोकांना हे कार्य खुपल्याने त्यांनी माझे मित्र पीटर नोरोन्हा यांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्यावर पोलीस कारवाई वल्याचा आरोप पंच सुदेश मयेकर यांनी केला.
मंत्र्यांना अंधारात ठेवून कळंगुटमध्ये कोविड केंद्र
सध्या सुदेश मयेकर यांना मंत्री लोबो यांनी आपले सर्व दरवाजे बंद केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून मयेकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात कळंगूट रेसिडन्सीमध्ये मोफत कोविड केंद्र सुरू केले आहे. केशव सेवा साधनातर्फे जरी हे केंद्र सुरू केले असले तरी त्यामागचे प्रमुख सूत्रधार मयेकर आहेत, असा मंत्री लोबोंचा दावा आहे. मंत्री लोबो यांना अंधारात ठेवून कोविड केंद्र केल्याने व गावातील लोकांना मोफत रुग्णसेवा व जेवणाची सोय येथे केल्याने मंत्री लोबो बरेच नाराज झाले आहेत. त्यातूनच हे राजकारण झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, मयेकर यांना येत्या विधानसभेत निवडणुकीच्या तयारीला लागा, असा उपदेशही पक्षाने दिल्याचे समजते.
बियाण्याच्या पिशव्या आणून ठेवल्या पोलीस स्थानकात
ज्या बियाण्याच्या पिशव्या घरोघरी पोहोचविण्यात आल्या होत्या, त्या गाडी चालक पीटर नोरोन्हा याला अटक केल्याची माहिती मिळताच शेतकरी बांधवांनी दिलेल्या त्या पिशव्या कळंगूट पोलीस स्थानकात आणून परत केल्या. काही वयोवृद्ध महिला आपल्या डोक्यावरून तर काही दुचाकींनी पिशव्या कळंगूट पोलीस स्थानकावर आणताना पहायला मिळाल्या. यावेळी शेतकऱयांनी सरपंचाचा निषेध करीत आम्हाला पंचायतीने दिलेल्या बियाण्याच्या पिशव्याच नको, आम्ही आणण्यास समर्थ आहोत. कठीण प्रसंगी आम्हाला सुदेश मयेकरांनी साथ दिली उद्या ते विधानसभा निवडणुकीत उतरले तरी आम्ही त्यांना साथ देण्यास तयार आहोत. नाहक गरीब शेतकऱयांसोबत मंत्री लोबो व सरपंचांनी राजकारण करू नये, असे ते म्हणाले.









