प्रतिनिधी / बेंगळूर :
राज्य भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा गुरुवारी नवी दिल्ली दौऱयावर गेले असून ते पक्षश्रेष्ठींशी विविध मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया राज्य विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते हायकमांडकडे विनंती करणार असल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होणार की नंतर?, याबाबत येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतनिधी, राज्यातील प्रस्तावित असणाऱया योजनांना मंजुरी यासह अनेक विषयांसंबंधी भाजप वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गुरुवारी दुपारी नवी दिल्ली गाठले. पाच महिन्यांनंतर त्यांनी दिल्ली दौरा हाती घेतला आहे. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करावा, कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यावे, कोणाला वगळावे यासंबंधी शुक्रवारी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत.
विधानपरिषदेवर निवडून आलेले आर. शंकर, एम. टी. बी. नागराज यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अनिवार्य परिस्थिती असल्याची बाब ते हायकमांडच्या निदर्शनास आणून देतील. मंत्रिमंडळात चार जागा रिक्त आहेत. आर. शंकर आणि नागराज यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी, सी. पी. योगेश्वर व आणखी काही आमदारांची नावे चर्चेत आहेत. सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करावा की अधिवेशनानंतर हे भाजप हायकमांड ठरविणार आहेत.









