वनखात्याकडून परवानगी असल्याचे स्पष्ट, पर्यावरणप्रेमी आक्रमक
प्रतिनिधी/ बेळगाव
मंडोळी रोड येथील धोकादायक वृक्ष वनखात्याने हटविला. दरम्यान किरण जाधव आणि काही पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध करून नाराजी व्यक्त केली. मात्र याबाबत वनखात्याशी संपर्क साधला असता या वृक्षासाठी रितसर परवानगी आहे. शिवाय शासनाकडून ऑर्डरदेखील मिळाली आहे. त्यानुसारच आम्ही हा धोकादायक वृक्ष तोडला असल्याची माहिती वनखात्याने दिली.
शहरात रस्त्याशेजारी धोकादायक, जुनाट आणि कमकुवत झाडांची संख्या वाढली आहे. दरम्यान अशी धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी काही नागरिकांतून होऊ लागली आहे. दरम्यान झाडे हटविण्यासाठी वनखात्याकडे अर्ज दिल्यास अशी झाडे हटविली जातात. त्यानुसार खात्याने परवानगी आणि शासनाच्या ऑर्डरीनुसार संबंधित झाड तोडले आहे, अशी माहिती वनखात्याने दिली. मात्र काही पर्यावरणप्रेमींनी बेकायदेशीर वृक्षतोड केल्याची तक्रार केली आहे. वाहतुकीस अडथळा किंवा कोणताही धोका नसलेले झाड वनखात्याने हटविले आहे, अशी तक्रार काही पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
याबाबत वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांना कोणतीही लेखी तक्रार दाखविता आली नाही. शिवाय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेल्याचीही तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. शिवाय कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर वृक्षाची कत्तल करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.









