दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून कारवाई
प्रतिनिधी /बेंगळूर
सिरियातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून माजी आमदाराचा नातवाची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांकडून चौकशी केली जात असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळूरमधील निवासस्थानावर राष्ट्रीय एनआयएने बुधवारी छापा टाकला. एनआयएच्या आयजीपी उमा यांच्या नेतृत्त्वाखाली 25 हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.
माजी मंत्री बी. एम. इदिनब्बा यांचे पुत्र बी. एम. बाशा हे रियल इस्टेट उद्योजक आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्या मंगळूर जिल्हय़ाच्या उळ्ळालनजीकच्या मास्तिकट्टे येथील निवासस्थानावर एनआयएच्या पथकाने छापा टाकला. सायकांळपर्यंत बाशा यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली.
बी. एम. बाशा यांची दोन मुले विदेशात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी काही वर्षांपूर्वी केरळमधून बेपत्ता झाली होती. ती सिरियातील आयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच संशय एनआयएला आहे. बाशा यांच्या कुटुंबातील सदस्याने आयएसशी संबंधित युटय़ूब चॅनेल सबस्क्राईब केल्याचे समजते. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱयांशी फोनवरून संभाषण केल्याचा संशयही असल्याने एनआयए अधिकाऱयांनी अधिक तपास हाती घेतला आहे.
यापूर्वी केरळमध्ये अटक केलेल्या आरोपीशी संपर्क साधल्याचा आरोपही आहे. त्यामुळे सखोल चौकशी केली जात आहे. या कारवाईविषयी स्पष्टपणे माहिती मिळालेली नसली तरी मंगळूर आणि बेंगळूरमधून प्रत्येकी एकाला एनआयएने ताब्यात घेतल्याचे समजते.









