पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ सातारा
पालिका प्रशासनातर्फे नियमितपणे विविध माध्यमातुन स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यात येते. ‘स्वच्छ हा सातारा, सुंदर हा सातारा’ अशा घोषणा घेऊन दररोज पालिकेच्या गाडय़ा शहर परिसरातील विविध मार्गावरून फिरत असतात. पण पालिका प्रशासनाने मात्र ‘ऐतिहासीक अशा मंगळवार तळय़ा’ च्या स्वच्छतेकडे मात्र कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सध्या या तलावावर संपुर्ण शेवाळाची चादर पसरलेली आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. दरम्यान, शेवाळामुळे बघता क्षणी हे मंगळवार तळं आहे की टेनिस ग्राऊंड असा भास होत आहे.
यापुर्वी ही या तलावात मासे मरून पडले होते. त्यादरम्यान ही अशाच प्रकारे येथे दुर्गंधी पसरली होती, त्यावेळी पालिका प्रशासनातर्फे हे तलाव स्वच्छ करून येथील पाण्याचे रिसायकलींग केले होते. पण सध्या पुन्हा या तलावाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सध्या सर्वत्र शेवाळाची हिरवी चादर पसरली आहे. यामुळे तलावातील पाणीच दिसेनासे झाले आहे.
या तलावाच्या पाण्यामुळे येथे डासांचे सांम्राज्य ही मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. जरी हे खासगी तलाव असले तरी इतिहासकालीन तलाव असल्याने याच्या स्वच्छतेची जवाबदरी यापुर्वी पासुन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येते. पण मागील काही महिन्यांपासुन या तलावाच्या स्वच्छतेकडेच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे. यापुर्वी ही अशाच प्रकारे या तलावातील पाणी दूषित झाल्याने पालिका प्रशासनातर्फे जवळपास 28 लाख रूपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. पण पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.








