प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी काही प्रमाणात खाली आली होती. यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा आकडेवारीत वाढ झाली असून बेळगाव जिल्हय़ात एकूण 404 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. बेळगाव तालुका विभागातील 157 जणांचा यामध्ये समावेश आहे. तर दिवसभरात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील 67 हजार 262 जणांच्या आरोग्यावर आतापर्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. चौदा दिवसांच्या क्वारंटाईनची संख्या झपाटय़ाने वाढली असून 19 हजार 425 जण क्वारंटाईनमध्ये आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळय़ा शहरांमधून गावी परतलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. इस्पितळांमध्ये आयसोलेटेड करून ठेवण्यात आलेल्यांची संख्या 3581 आहे. तर 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले रुग्ण 8111 वर जाऊन पोहोचले आहेत. आजवर 36 हजार 145 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.
65 हजार 699 जणांची स्वॅब तपासणी
आतापर्यंत 65 हजार 699 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 56 हजार 270 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतचा मृतांचा आकडा 138 वर पोहोचला आहे. मंगळवारी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव जिल्हय़ातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8376 वर पोहोचली आहे. तर त्यापैकी मंगळवारपर्यंत निगेटिव्ह होऊन इस्पितळांमधून डिस्चार्ज झालेले रुग्ण 4,658 इतके आहेत. कोरोनाबद्दलची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्ण संख्या कमी होईल ही आशा धरणे चुकीचे ठरत असून दिवसागणिक वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरला आहे.
चिमुकल्याचे हात साकारताहेत बाप्पाच्या मूर्ती









