प्रतिनिधी/ लांजा
लांजा देवराई येथील प्रकाश भोवड यांच्या खूनाचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा लावण्यात पोलीसांना यश आले आहे. या खूनामध्ये गांजा विक्रीचेही कनेक्शन असल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित बेकायदेशीर सामग्रीच्या विक्री व्यवहारांमध्येही गुतल्याची माहिती पुढे येत आहे.
लांजा देवराई येथील प्रकाश भोवड याच्या खूनाने व त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रूपेश कोत्रे व सतीश पालये या संशयितांमुळे लांजातील गुन्हेगारी जगतावर पुन्हा प्रकाश पडला आहे. लांजा परिसरात गांजा, चरस अन्य बेकायदेशीर अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. याचे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून यातील काही जणांना पोलीसांनी याआधी संशयावरून ताब्यातही घेतले होते. मात्र, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यात अपयश आले होते. या अवैध धद्यांबाबत नागरिकांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली होती, अशी माहिती पुढे येत आहे.
चार महिन्यापूर्वी 12 मार्च रोजी आंबा घाटात मिळालेल्या मृतदेहाचे गुढ रविववारी पोलीसांनी उकलले होते. शर्टवरीला लोगोमुळे याच्या मुळापर्यंत जाण्यात यश आले. हा मृतदेह लांजा देवराई येथील प्रकाश भोवड याचा असल्याचे स्पष्ट झाले असून लांजातीलच रूपेश कोत्रे व सतीश पालये या संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र, खूनामागील पोलीसांनी सांगितले कारण किरकोळ वाटत आहे. जातीवाचक वादातून खून झाल्याचे पोलीसांनी म्हटले होते, मात्र तेवढेच कारण त्यामागे नसल्याची चर्चा होत आहे.
या खून प्रकरणात अटक केलेल्यांच्या व्यवसायाबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आज लांजातील अनेक तरूण गांजासारख्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेले आहेत. अशा अनेक अवैध धद्यांमध्ये संशयितांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. या व्यवसायतीला वादही या खूनामागे असल्याचे बोलले जात असून पोलीसांनीच आता याबाबत खोलात जाऊन तपास करण्याची मागणी होत आहे.









