सैन्यासाठी पेट्रोल बॉम्ब अन् आवश्यक गोष्टींची निर्मिती
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा सोमवार हा पाचवा दिवस होता. रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये चहुबाजूने पुढे सरकत आहे. अनेक शहरांवर कब्जा केल्याचा दावा करण्यात येतोय. याचदरम्यान युक्रेनच्या सैन्यासाठी अनेक लोक सरसावले आहेत. हे लोक पूर्वी घरांमधून रशियाच्या सैनिकांवर हल्ले करत होते. परंतु आता ते रस्त्यांवर उतरून युद्ध लढत आहेत. स्वतःच्या सैनिकांसाठी आवश्यक सामग्री आणि पेट्रोल बॉम्ब तयार करत आहेत.

ब्रेडयांस्क येथे एक सर्वसामान्य माणूस भूसुरुंग रस्त्यावरुन हाताने हटविताना दिसून आला आहे. त्याने हा भूसुरुंग हटविण्यासाठी बॉम्ब डिस्पोजल युनिटची प्रतीक्षा केली नाही. युक्रेनियन सैन्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्याने ही जोखीम पत्करली. लोक त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.
युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांना शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येतेय. कीव्ह, लीव्हसमवेत अनेक शहरांमध्ये लोक रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी मोठय़ा संख्येत पेट्रोल बॉम्ब तयार करत आहेत. पेट्रोल बॉम्ब तयार केल्यावर लोक ते इतर भागांमध्ये पोहोचवत आहेत. याकरता कार, ट्रक आणि बाइकचा वापर केला जातोय. युक्रेनमध्ये स्थानिक लोक शस्त्रास्त्रनिर्मिती करत आहेत. सामूदायिक भवनांमध्ये लोक सैनिकांसाठी आवश्यक पोशाख तयार करताना दिसून आले आहेत.









