ऑनलाईन टीम / भुसावळ :
भुसावळच्या आयुध निर्माणीत उत्पादित अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड एमके – 1 ची नुकतीच पोखरण येथे यशस्वी चाचणी करण्यात आली. हे पॉड तब्बल 38 कि.मी.वरून आपला लक्ष्यभेद करते. आयुध निर्माणीचे जनसंपर्क अधिकारी व डीजीएम बी. देवीचंद यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आयुध निर्माणीत 2014 पासून पिनाका रॉकेट लाँचर पॉड एमके-1 बनविण्याचे काम केले जात आहे. ‘पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’मधून रॉकेट डागले जाते. रॉकेटचे उद्दिष्ट आणि दिशा पॉडवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या चाचण्या पार केल्यानंतरच हे ‘पॉड’ रॉकेट लोड करण्यासाठी पाठविले जाते. या चाचणीमुळे आयुध निर्माणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डिसेंबर 2021 मध्ये पोखरणमध्ये पिनाका रॉकेट पॉडची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट पॉड (डीपीआयसीएम) तसेच दिशानिर्देशित पॉड तयार करण्याचे कामही यशस्वीपणे सुरू आहे. एनहान्स्ड पिनाका रॉकेटची क्षमता 45 कि.मी., तर गाइडेड पिनाका रॉकेटची क्षमता 75 कि.मी. आहे, असेही देवीचंद यांनी सांगितले.









