श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये गुरुवारी बांधकाम सुरू असलेल्या भुयारी मार्ग दुर्घटनेतील ढिगाऱयाखाली दबलेल्या 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात रविवारी चौथ्या दिवशी यश आले. एकूण 10 पैकी पाच मृत मजूर पश्चिम बंगालमधील आहेत. तसेच शुक्रवारी ढिगाऱयातून बाहेर काढण्यात आलेला पहिला मृतदेह पश्चिम बंगालमधील एका मजुराचा होता. बचावकार्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील या बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे 10 मजूर दगड-मातीमध्ये अडकले होते. या दुर्घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या पथकांकडून गेल्या चार दिवसांपासून मदत आणि बचावकार्य केले जात होते. आता सर्व 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पीडितांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आल्याचे रविवारी जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले. गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास रामबनमधील खूनी नाल्याजवळ निर्माणाधीन बोगदा महामार्गावर कोसळल्यामुळे तेथे काम करणारे सरला कंपनीचे 11-12 कामगार अडकले होते, असे रामबन जिह्याचे पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले.









