पर्यटकांना होणार अस्वलाचे दर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात गत महिन्यात दाखल झालेल्या दोन अस्वलांना पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राणीप्रेमी व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे. गत महिन्यात दाखल झालेल्या तीन सांबर, 1 तरस आणि 2 अस्वलांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. अखेर त्यांची चाचणी घेऊन संग्रहालयात मुक्त वातावरणात पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधला जात आहे. तब्बल 34 एकरात पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयात गतवषी सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, सांबर, तरस, चितळ, मगर आणि इतर पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यापाठोपाठ यंदा दोन अस्वले दाखल झाली आहेत. त्यामध्ये एक मादी तर एक नर जातीच्या अस्वलाचा समावेश आहे.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. या कालावधीत भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालय दोन दिवस बंद राहणार आहे. मात्र सोमवारपासून पुन्हा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत पर्यटकांना खुले करण्यात येणार आहे. प्रौढ व्यक्तीसाठी 40 रुपये तर पाच वर्षांखालील बालकांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करूनच पर्यटकांना आत सोडले जाणार आहे.
अस्वलांची मुक्त वातावरणात चाचणी
प्राणीसंग्रहालयातील निवाराशेडमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या दोन अस्वलांची बाहेर मुक्त वातावरणात चाचणी घेण्यात आली. म्हैसूर येथून आणलेली ही दोन अस्वले स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतात की नाही, याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पर्यटकांसाठी संग्रहालयात खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता सिंह, वाघ, बिबटय़ाबरोबरच अस्वलांनादेखील पाहता येणार आहे.
– राकेश अर्जुनवाड (आरएफओ, भुतरामहट्टी)









