भारतीय सैन्याची तुकडी रवाना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि मंगोलियादरम्यान सोमवारपासून ‘नोमेडिक एलिफेंट-2023’ सैन्याभ्यास सुरू होणार आहे. या सैन्याभ्यासात सामील होण्यासाठी भारतीय सैन्याची तुकडे रविवारी रवाना झाली आहे. या तुकडीत 43 सैनिक सामील आहेत.
भारत आणि मंगोलिया यांच्यादरम्यान ‘नोमेडिक एलिफेंट-2023’ सैन्याभ्यास 17 ते 31 जुलैपर्यंत मंगोलियाच्या उलानबटार येथे पार पडणार आहे. नोमेडिक एलिफेंट-2023 हा भारत आणि मंगोलियामधील एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशच्या बकलोह येथे ऑक्टोबर 2019 मध्ये या सैन्याभ्यासाचे आयोजन झाले होते.
मंगोलियन सशस्त्र दल युनिट 084 चे सैनिक आणि जम्मू-काश्मीर लाइट इन्फ्रंट्री रेजिमेंटचे सैनिक या सैन्याभ्यासात भाग घेणार आहेत. हा सैन्याभ्यास दोन्ही देशांच्या सैन्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सकारात्मक सैन्यसंबंध निर्माण करणे, सर्वोत्तम प्रशिक्षणाचे आदान-प्रदान करणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान आंतर-संचालन, सौहार्द आणि मैत्री निर्माण करणे हा या सैन्याभ्यासाचा उद्देश आहे. यात पर्वतीय क्षेत्रांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांवर भर देण्यात येणार असल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांचे सैनिक स्वत:चे कौशल्य आणि क्षमतांमध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रशिक्षण कृतींमध्ये सामील होणार आहेत.









