तणाव कमी होत असल्याची चिन्हे
वृत्तसंस्था / जम्मू
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि सीमेवरील गोळीबारामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावादरम्यान आता स्थिती सुधारताना दिसून येत आहे. रमजानच्या अखेरीस भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱयांनी ईदची मिठाई पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानातूनही भारतासाठी मिठाई सैन्याकरता पाठविण्यात आली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील काही दिवसांपासून असणाऱया शांततेदरम्यान दोन्ही देशांदरम्यान पुन्हा सुरू झालेल्या या परंपरेला एक चांगला संकेत म्हणून पाहिले जात आहे.
भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पुंछ-रावलकोट क्रॉसिंग पॉइंट आणि मेंढर क्रॉसिंग पॉइंटवर ईद साजरा केला आहे. दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱयांनी परस्परांमध्ये मिठाई आणि शुभेच्छांचे आदान-प्रदान केले आहे. दीर्घ काळानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांनी परस्परांमध्ये अशाप्रकारे शुभेच्छांची देवाणघेवाण केली आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि 2019 मधील हवाई हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले होते. अशा स्थितीत सीमा पार व्यापारासह पाकिस्तानसोबतचे भारताचे सर्व संबंध खराब झाले होते. याचबरोबर प्रत्यत्र नियंत्रण रेषेवर परंपरेच्या स्वरुपात होत असलेल्या मिठाई आणि शुभेच्छांचे आदान-प्रदानही बंद करण्यात आले होते.
काही महिन्यांपूर्वी पर्यंत पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या सर्व भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात गोळीबार केला जात होता, यामुळे सीमावर्ती भागांमध्ये तणावाची स्थिती होती. यादरम्यान भारत-पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱयांदरम्यान सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये चर्चा झाली होती. याचमुळे मागील काही काळात सीमावर्ती भागांमध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे.









