दुबई / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान लढतीची 63 हजार तिकीटे काही तासातच संपल्याचे आयसीसीने जाहीर केले. 2021 मधील आवृत्तीत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला असला तरी या पारंपरिक, कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीची क्रेझ अजिबात कमी झाली नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले.
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत दि. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार असून या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 1 लाख इतकी आहे. यात पहिल्या टप्प्यात 63 हजार तिकीटांची विक्री सोमवारी करण्यात आली.
आयसीसीने सकाळी 6.30 च्या दरम्यान तिकीटे ऑनलाईन उपलब्ध असल्याचे ट्वीट केले आणि दुपारी 1.30 वाजेपर्यंत या सर्व तिकीटांची खरेदी केली गेली. या लढतीची आता ऑफिशियल हॉस्पिटॅलिटीतील आणखी काही तिकीटे कालांतराने उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आयसीसीने याप्रसंगी जाहीर केले. या स्पर्धेत भारताचा सुपर-12 फेरीत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व पात्रता संघांसह दुसऱया गटात समावेश आहे.









