वृत्तसंस्था/ दुबई
कोरोना महामारी समस्येमुळे तब्बल एक वर्षानंतर गुरुवारी येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात भारताने ओमानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.
या सामन्यात 42 व्या मिनिटाला ओमानने पहिला गोल नोंदविला. भारताच्या चिंगलेनसाना सिंगने नजरचुकीने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून ओमानला हा पहिला गोल बोनस म्हणून बहाल केला. 55 व्या मिनिटाला मनवीर सिंगने भारताला बरोबरी साधून दिली. या सामन्यासाठी प्रशिक्षक स्टिमॅक यांनी भारतीय संघामध्ये बराच बदल केल्याने दहा खेळाडूंनी आपले आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले होते. 2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सध्या सुरू असलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील दोन्ही सामने ओमानने भारताविरुद्ध यापूर्वी जिंकले आहेत. गुरुवारच्या सामन्यात ओमानने 27 व्या मिनिटाला संघाला मिळालेला पेनल्टी वाया घालविला. भारतीय संघाची या सामन्यातील कामगिरी समाधानकारक झाल्याचे स्टिमॅक यांनी सांगितले. फिफाच्या ताज्या मानांकनात ओमान सध्या 81 व्या तर भारत 104 स्थानावर आहे. आता भारताचा दुसरा आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचा सामना संयुक्त अरब अमिरातबरोबर येत्या सोमवारी खेळविला जाणार आहे.









