तीन दिवसांच्या दौऱयावर विदेशमंत्री -पंतप्रधान बॅनेट यांना भेटणार जयशंकर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नफ्ताली बॅनेट यांचे सराकर सत्तेवर आल्यावर भारताने इस्रायलसोबतचे स्वतःचे संबंध अधिक दृढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार विदेशमंत्री एस. जयशंकर चालू आठवडय़ात तीन दिवसांच्या इस्रायल दौऱयावर जाणार आहेत. विदेशमंत्री इस्रायलपूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्ये पोहोचतील आणि तेथून इस्रायलसाठी रवाना होणार आहेत.

विदेशमंत्री जयशंकर 19-21 ऑक्टोबरपर्यंत इस्रायलच्या दौऱयावर असणार आहेत. कोरोना संकट आणि देशाच्या अंतर्गत मुद्दय़ांमध्ये व्यग्र राहिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौरे करत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत निकटच्या सहकाऱयांसोबत संपर्क राहण्याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जयशंकर यांच्यावर आली आहे. संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायलसोबतचे सुरक्षा संबंध डोवाल हेच हाताळतात.
भारत सध्या छोटय़ा देशांसोबत मेक्सिको, ग्रीस, आर्मेनिया आणि किर्गिस्तान यासारख्या देशांसोबतचे संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. जयशंकर यांच्या दौऱयाचा मुख्य उद्देश तेल अवीवसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नवा वेग प्रदान करणे आहे. यात ड्रोन रडार, बॉर्डर सेन्सरसमवेत अनेक सामग्रींच्या कराराचा मुद्दा सामील आहे. विदेशमंत्री दुबईत अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील स्थिती समवेत क्षेत्रीय वातावरणावर युएईच्या नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे समजते.
युएईमध्ये सुमारे 40 लाख भारतीयांचे वास्तव्य आहे. तर युएईने 13 ऑगस्ट 2020 रोजी अब्राहम कराराच्या अंतर्गत इस्रायलसोबत कूटनीतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. भारताने युएई आणि इस्रायल यांच्यातील संबंधांचे समर्थन केले आहे.
जयशंकर यांनी मागील आठवडय़ातच मध्य आशियाचा दौरा केला होता. नव्या विदेशी दौऱयामध्ये अफगाणिस्तानचा मुद्दा चर्चेत महत्त्वाचा ठरणार आहे. इराण आणि मध्य आशियात आगामी काही महिन्यांमध्ये दुष्काळ पडण्याची भीती आहे. यामुळे अफगाणिस्तान अन्नसंकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मानले जात आहे.









