पहिल्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक : आता दुसऱया डोसची तयारी सुरू : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुभवार्ता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच भारतीय लसही दृष्टिपथात आल्याचे दिसून येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेककडून विकसित करण्यात आलेल्या लसीचे प्राथमिक परिणाम सकारात्मक आल्याची माहिती संशोधकांकडून उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता दुसऱया डोसची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासंबंधीच्या सर्व घडामोडींवर सरकारचेही लक्ष आहे.
जगभरात फोफावलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावी लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. लसीच्या शोधासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोनावरील लस विकसित करत आहेत. भारतही यात मागे राहिला नसून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या लसीसंदर्भात प्राप्त वैद्यकीय चाचणीनुसार प्राथमिक टप्प्यात लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. देशातील 12 शहरांमध्ये लसीच्या मानवी चाचण्या झाल्या असून त्यामधील सर्व अहवाल सकारात्मक आले आहेत.
कोणतेही साईडइफेक्ट्स नाहीत
भारतातील 12 शहरात 375 स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येक स्वयंयसेवकाला लसीचा डोस दिल्यानंतर त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील पाहणीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जेवढय़ा स्वयंसेवकांना ही लस दिली आहे त्यांच्यावर कोणतेही साईडइफेक्ट्स जाणवले नसल्याची माहिती रोहतकमधील वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली. पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत संपणे अपेक्षित आहे.
पुढील टप्प्याकडे यशस्वी वाटचाल
पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच लसीचा दुसरा टप्पा हाती घेतला जाणार आहे. सध्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. या नमुन्यांच्या मदतीने लसीच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास केल्यानंतर स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू होणार आहे. आता ही लस दुसऱया टप्प्यात किती प्रभावशाली ठरते हे पाहिले जाणार आहे. दिल्लीतील एम्समध्ये लसीच्या चाचणीसाठी 16 स्वयंसेवकांना दाखल करण्यात आल्याचे युनिटप्रमुख संजय रॉय यांनी सांगितले.
‘ड्रग कंट्रोलर’ची नजर राहणार
सर्वच 12 ठिकाणी या लसीचे निकाल पाहिल्यानंतर आता कंपनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी दुसऱया टप्प्यात संपर्क साधणार आहे. जर सर्व काही योग्य राहिले तर येत्या काही महिन्यातच ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती वैद्यकीय संशोधकांकडून देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात वेगवेगळय़ा वयातील स्वयंसेवकांना डोस देऊन लसीची योग्यता तपासली जाणार असल्याचे समजते.









