1,750 स्वदेशी व्हेईकल्सची खरेदी होणार : पाकिस्तान-चीनसाठी धोक्याची घंटा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्कराच्या ताफ्यात अत्याधुनिक आणि नवी शस्त्रे समाविष्ट होण्यामुळे भारतीय सैन्याचे बळ लवकरच वाढणार आहे. 1750 फ्यूचरिस्टिक इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हेईकल्स खरेदीसाठी सैन्याने प्रयत्न सुरू केले आहेत. ही विशेष लढाऊ वाहने शत्रूंचे तळ नष्ट करण्यासाठी आणि सैन्याच्या हालचाली वेगवान करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. लडाखसारख्या अत्यंत खडतर भागाबरोबरच वाळवंट आणि पर्वतीय भागांमध्ये अशी वाहने तैनात करण्याची योजना आहे. या माध्यमातून भारतीय सैन्य चीन आणि पाकिस्तानला सडेतोडपणे धडक देऊ शकतो.
या प्रकल्प आणि योजनेवर बऱयाच दिवसांपासून काम सुरू होते. लडाखमधील चीनबरोबर नुकत्याच झालेल्या वादाच्या वेळी सैनिकांची वाहतूक करण्यास आणि शत्रूंचे टँक नष्ट करण्यास सक्षम असलेल्या या वाहनाची आवश्यकताही उघडकीस आली आहे. लडाखमध्ये मिळालेल्या अनुभवामुळे भारतीय सैन्य टप्प्याटप्प्याने 350 लाईट टँक खरेदी करण्याचा विचारही करीत आहे. यासह कामगिरीवर आधारित लॉजिस्टिक्स, विशेष तंत्रज्ञान, अभियांत्रिकी सहाय्य पॅकेजेस आणि इतर देखभाल आणि प्रशिक्षण आवश्यकता देखील विचारात घेतल्या जात आहेत.









