द.आफ्रिकेवर 45 धावांनी विजय, यशचे अर्धशतक, विकी-राज बावाची भेदक गोलंदाजी
वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन
चार वेळा स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया भारताच्या युवा संघाने येथे सुरू झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना दक्षिण आफ्रिकेवर 45 धावांनी विजय मिळविला. कर्णधार यश धुळ आणि गोलंदाज विकी ओस्तवाल व राज बावा हे भारतीय विजयाचे शिल्पकार ठरले. 5 बळी घेणाऱया विकी ओस्तवालला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने यश धुळच्या अर्धशतकाच्या (82) बळावर 46.5 षटकांत सर्व बाद 232 धावांची मजल मारली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव डावखुरा स्पिनर विकी ओस्तवाल व वेगवान गोलंदाज राज बावा यांच्या भेदक माऱयासमोर 45.4 षटकांत 187 धावांत गुंडाळून भारताने विजय साकार केला. ओस्तवालने 5 तर बावाने 4 बळी मिळविले.
233 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज इथन जॉन कनिंगहॅम पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्याला राजवर्धन हंगरगेकरने पायचीत केले. खराब सुरुवात झाली असली तरी व्हॅलिन्टाईन किटिमे (25) व देवाल्ड बेव्हिस (65) यांनी सावध खेळ करीत दुसऱया गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी करीत थोडाफार डाव सावरला. 10 षटकांत त्यांनी 1 बाद 38 अशी मजल मारली होती. किटिमेने रवि कुमारला चौकार व षटकार ठोकत 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर बावाच्या 11 व्या षटकात बेव्हिस व किटिमे यांनी 17 धावा चोपल्या. ओस्तवालने ही जोडी फोडताना किटिमेला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. ओस्तवालने नंतर जी. मारीला बाद केल्यावर त्यांची स्थिती 3 बाद 83 अशी झाली.
यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी द.आफ्रिकन फलंदाजांना फारसे वरचढ होऊ दिले नाही. बावाने स्थिरावलेल्या ब्रेव्हिसला 36 व्या षटकात बाद केल्यानंतर द.आफ्रिकेचा डाव कोलमडला. कर्णधार जॉर्ज व्हान हीर्डेनने 36 धावा जमवित संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱया बाजूने पुरेशी साथ मिळाली नाही. बावा व ओस्तवाल यांनी मधली व तळाची फळी झटपट गुंडाळून 46 व्या षटकांत द.आफ्रिकेचा डाव 187 धावांत संपुष्टात आणत विजय साकार केला.
यश धुळचे अर्धशतक
तत्पूर्वी, भारताचीही 2 बाद 11 अशी खराब सुरुवात झाली होती. पण कर्णधार यश धुळने शैक रशीद (31), कौशल तांबे (35), निशांत सिंधू (27) यांच्या मदतीने संघाला बऱयापैकी धावसंख्या गाठून दिली. पावसाचा व्यत्यय आल्याने सामन्याला 40 मिनिटे उशिराने सुरुवात झाली होती. पावसाळी हवामानामुळे खेळपट्टी गोलंदाजीस अनुकूल ठरेल, या विचाराने द.आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजी दिली. दोन झटपट बळी गेल्याने त्यांचा निर्णय सार्थ ठरल्याचे वाटू लागले. पण धुळने संघाला सव्वादोनशेपारचा टप्पा गाठून दिला. डावखुरा वेगवान गोलंदाज अफिवे न्यान्दाने हरनूर सिंग (1) व त्याचा जोडीदार अंगकृश रघुवंशी (5) यांना पायचीत केले. हरनूरने आशिया चषक स्पर्धेत चमकदार फलंदाजी केली होती आणि येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही शतक नोंदवले होते.
2 बाद 11 अशा स्थितीनंतर यश व रशीद यांनी तिसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. अल्डेरला स्वीप करताना रशीद 31 धावांवर पायचीत झाला. त्याने 54 चेंडूच्या खेळीत 4 चौकार मारले. यशने नंतर निशांत सिंधूसमवेत 44 धावांची भर घातली. सिमलेनच्या थेट फेकीवर यश धावचीत झाला. त्याने 100 चेंडूत 11 चौकारांसह 82 धावा केल्या. कौशल तांबेने अखेरच्या टप्प्यात महत्त्वाच्या 35 धावा जोडल्याने भारताला दोनशेचा टप्पा पार करता आला. बोस्टने भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून 47 व्या षटकात भारताचा डाव संपुष्टात आणला. तांबे व हंगरगेकर यांना त्याने पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. आशिया चषक जिंकलेल्या भारताची पुढील लढत बुधवारी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः यू-19 भारत 46.5 सर्व बाद 232 ः यश धुळ 11 चौकारांसह 82, रशीद 4 चौकारांसह 31, निशांत सिंधू 5 चौकारांसह 27, तांबे 5 चौकारांसह 35, राज बावा 13, अवांतर 22. गोलंदाजी ः मॅथ्यू बोस्ट 3-40, न्यान्दा 2-29, ब्रेविस 2-43, लियाम अल्डेर 1-40, कोपलँड 1-44, यू-19 द.आफ्रिका 45.4 षटकांत सर्व बाद 187 ः देवाल्ड ब्रेव्हिस 6 चौकार, 2 षटकारासह 65, व्हॅलेन्टाईन किटिमे 2 चौकार, 2 षटकारांसह 25, हीर्डेन 3 चौकार, 1 षटकारासह 36, अल्डेर 17, अवांतर 16. गोलंदाजी ः राज बावा 4-47, विकी ओस्तवाल 5-28, हंगरगेकर 1-38.
आयर्लंड, संयुक्त अरब अमिरात, झिम्बाब्वे यांचेही विजय
या स्पर्धेत झालेल्या अन्य सामन्यात जोशुआ कॉक्सच्या शतकाच्या बळावर आयर्लंडने युगांडावर तर संयुक्त अरब अमिरातने कॅनडावर विजय मिळविला. याशिवाय झिम्बाब्वेनेही विजयी सुरुवात करताना गट क मधील सामन्यात पापुआ न्यूगिनियाचा दणदणीत पराभव केला.
कॉक्सने 113 चेंडूत नाबाद 111 धावा केल्यामुळे आयर्लंडने 9 बाद 236 धावा जमविल्या. त्यानंतर युगांडाचा कर्णधार पास्कल मुरुन्गीने 63 व जुमा मियाजीने 38 धावा जमविल्या तरी आयर्लंडला विजयापासून ते रोखू शकले नाहीत.
संयुक्त अरब अमिरातने 7 बाद 284 जमविल्या. अली नसीरने 50 चेंडूत 73 धावा फटकावल्या तर पुन्य मेहराने 71 धावा जमविल्या. कॅनडाचा कर्णधार मिहिर पटेलने 105 चेंडूत 96 धावा करीत आशा निर्माण केल्या होत्या. अनूप शर्मा (46) व कैरव शर्मा (43) यांनी त्याला चांगली साथ दिली. पण त्यांचा डाव 235 धावांत आटोपल्याने यूएई 49 धावांनी विजयी झाले.
झिम्बाब्वेने दुबळय़ा पापुआ न्यूगिनियाविरुद्ध 9 बाद 321 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर पापुआ न्यूगिनियाचा डाव 93 धावांत गुंडाळून 228 धावांनी दणदणीत विजय मिळविला. सोमवारी यूएईची लढत पाकिस्तानशी होणार आहे.









