वृत्तसंस्था/ चेन्नई
सध्या सुरू असलेल्या अशियाई ऑनलाईन नेशन्स (विभागीय) चषक सांघिक महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत रविवारचा दिवस भारतीय महिला संघाला संमिश्र यश देणारा ठरला. या स्पर्धेच्या तिसऱया फेरीअखेर भारतीय महिला बुद्धिबळ संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे.
भारतीय महिला संघांने आपले पहिल्या दोन लढती जिंकल्यानंतर तिसऱया लढतीत त्यांना इराणकडून पराभव पत्करावा लागला. मेरी ऍन गोम्सच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिल्या फेरीत सिरियाचा 4-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. त्यानंतर दुसऱया फेरीत भारताने मंगोलियावर 2.5-1.5 अशा गुणांनी विजय मिळविला. त्यानंतर तिसऱया लढतीत मात्र इराणने भारताचा 2.5-1.5 असा पराभव केला. इराण आणि भारत यांच्यातील लढतीत भारताच्या आर वैशालीने आपला सामना जिंकला. पण भारताच्या भक्ती कुलकर्णी व पी.व्ही.नंदीदास यांनी आपले सामने गमविले.
या स्पर्धेत तृतीय मानांकित कझाकस्तान गुणतक्त्यात सहा गुणासह आघाडीवर असून व्हिएतनाम दुसऱया, इराण तिसऱया आणि इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आहे. आता या स्पर्धेला पुन्हा 16 ऑक्टोबरपासून फेरसुरूवात होणार असून पुरूषांच्या विभागातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या फेरीतील लढती होतील. त्याचप्रमाणे 17 ऑक्टोबरला महिलांच्या विभागातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या फेरीतील लढती खेळविल्या जाणार आहेत. सदर स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण 20 हजार अमेरिकन डॉलर्सची रक्कम ठेवण्यात आली असून वैयक्तिक गटातील पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदके दिली जातील. या स्पर्धेतील अंतिम फेरी 25 ऑक्टोबरला खेळविली जाईल.









