महिला ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसंदर्भात माजी कर्णधार मिथाली राजचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची भारतीय महिलांची संधी ही मुख्यत्वे वरच्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्मवर अवलंबून असेल, असे मत भारताची माजी कर्णधार मिथाली राजने व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेत येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनाही आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा कराव्या लागतील, असेही तिने म्हटले आहे.
भारताची संधी मोठ्या प्रमाणात आघाडी फळीवर अवलंबून असेल. स्मृती मानधना चांगली खेळत आहे आणि मॅचविनरही आहे. त्याचप्रमाणे हरमनप्रीत कौरही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पण आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासारख्या बलाढ्या संघांना हरवावे लागेल. त्यासाठी इतर फलंदाजांकडूनही साथ मिळण्याची गरज आहे, असे मिथाली राजने ‘आयसीसी’साठी लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे.
नुकताच यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविऊद्धच्या तिरंगी मालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिलेला भारतीय संघ अनुभवी शिखा पांडे वगळता तुलनेने अननुभवी वेगवान मारा घेऊन मैदानात उतरणार आहे. गोलंदाजांचा कस लागेल आणि तिथेच आम्हाला सुधारणा पाहायच्या आहेत, असे मिथालीने म्हटले आहे.
शेफाली वर्मा आणि रिचा घोष ही 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघातील जोडी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत खेळताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून घेईल आणि त्यामुळे त्यांच्याकडून चांगली कामगिरी घडेल, अशी आशा मिथालीने व्यक्त केली आहे. मी काही युवा खेळाडूंना पाहण्यास उत्सुक आहे. 19 वर्षांखालील भारतीय महिला संघात नक्कीच काही प्रतिभावान खेळाडू आहेत, ज्यांना आयसीसीच्या पहिल्या 19 वर्षांखालील ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत खेळताना पाहण्याची संधी मला मिळाली, असे मितालीने पुढे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया सर्वांत बलवान दावेदार
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा विभाग भक्कम असल्याने ते स्पर्धेच्या किताबाचे सर्वांत भक्कम दावेदार ठरतात आणि त्यांना सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची भरपूर संधी आहे, असे मत मिथालीला वाटते. ‘मला वाटते की, ऑस्ट्रेलिया हा सर्वांत बलवान दावेदार असल्याचे सर्व जण मान्य करतील आणि ते योग्यच आहे. मला चुरसपूर्ण सामन्यांची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे खूप कठीण आहे, कारण त्यांची फलंदाजीची ताकद बरीच मोठी आहे,’ असे मिथालीने पुढे म्हटले आहे.
असे फारसे संघ नाहीत जे त्यांना ‘हिटर्स’च्या बाबतीत टक्कर देऊ शकतील आणि त्यांच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे समान भूमिका बजावू शकतात. त्यामुळे एक खेळाडू जर अपयशी ठरली, तरी ती कसर दुसरी खेळाडू भरून काढू शकते, याकडे मिथालीनश लक्ष वेधले आहे. तथापि, मिथालीला वाटते की भारताकडे ऑस्ट्रेलियाविऊद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे.








