वृत्त संस्था/ कोलकाता
कोरोना महामारी समस्येमध्ये आता नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटची भर पडली असून दक्षिण आफ्रिकेत या नव्या व्हेरियंटने खळबळ माजविली आहे. दरम्यान याच कारणास्तव भारतीय क्रिकेट संघाचे प्रयाण एका आठवडय़ाने लांबणीवर टाकल्याची माहिती भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर 9 डिसेंबरला रवाना होणे अपेक्षित होते.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयात 3 कसोटी, 3 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला 17 डिसेंबरपासून प्रारंभ केला जाणार होता. पण, भारतीय क्रेकेट संघाचे प्रयाण लांबल्याने नियोजित वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. येत्या 2 दिवसांमध्ये उभय देशांच्या क्रिकेट मंडळाची चर्चा झाल्यानंतर या दौऱयातील नवे वेळापत्रक जाहीर केली जाईल, असे बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी सांगितले.









