अमेरिकेत 1338 अर्जांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कंपन्यांनी मागील वर्षात 2018-19 मध्ये अमेरिकेमध्ये 1,338 पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान उद्योग संघटना नास्कॉमच्या अहवालातून देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध, कृत्रिम एआय, रसायन आणि संचार तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी हे अर्ज सादर करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. उपलब्ध अहवालानुसार 2018-19 साठी सादर करण्यात आलेल्या पेटंट मिळविण्याच्या अर्जांमध्ये 69 टक्के तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधीत अर्ज सादर करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. यात कॉम्युटर तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि एआय आदीचा प्रमुख समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा देणारी कंपनी टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल या कंपन्या पेटंटला अर्ज करण्यात पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल 31 जानेवारी 2020 पर्यंत क्वेस्टेल आर्बिट पेटंट यांच्या माहितीच्या आधारे सादर करण्यात आला आहे. याच दरम्यान बिगर तंत्रज्ञान पेटंटसाठी अर्ज करण्याची संख्या 40.6 टक्के इतकी राहिलीय. यात प्रमुख रसायन, औषधी कंपन्या आणि मॅकेनिकल आदी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रांसाठी पेटंटला अर्ज सादर करण्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, वेल्सपन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन सर्वात पुढे आहेत.
2015 ते 2019 या कालावधीत भारतीय स्टार्टअपने 280 पेक्षा अधिक तंत्रज्ञानांशी संबंधीत पेटेंटकरीत अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक पेटेंट हे आरोग्याची देखभाल आणि चिकित्सा करणाऱया उपकरण क्षेत्राशी संबंधीत असल्याचे सांगितले आहे.









