बँक ऑफ अमेरिकेच्या सीईओंचे प्रतिपादन : मागणीत होतेय वाढ
वृत्तसंस्था/ दावोस
अर्थ मरगळीला सामारे जात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासा देणारे वृत्त आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मागणीत वाढ झाली असून आता त्याची स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली असल्याचे बँक ऑफ अमेरिकेने बुधवारी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या स्थितीत असून तेथे विक्री वाढत असल्याचे उद्गार बँक ऑफ अमेरिकेचे सीईओ ब्रायन टी मोयनिहान यांनी काढले आहेत.
भारताजवळ मोठी तरुण लोकसंख्या आणि प्रतिभावंत आहेत. या दोन्ही गोष्टींच्या क्षमतेचा अद्याप पूर्ण वापर झाला नसल्याचे मोयनिहान यांनी म्हटले आहे.
2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 3.2 टक्के तर अमेरिकेचा 1.7 टक्के राहणार आहे. सद्यकाळ हा मंद विकासाचा असून सर्वांना याच्याशी जुळवून घेत वाटचाल करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणात सुधारणा
अमेरिका अद्याप जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत हा मोठा देश असून तो विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तरुणांचा देश असलेल्या भारतातील शिक्षणात सुधारणा होत असून तेथे गुणवंतांची खाण असल्याचे ते म्हणाले.
चौथी औद्योगिक क्रांती
भारतीय अर्थव्यवस्थेत काम करण्याकरता कौशल्य आणि दक्षता उपलब्ध आहे. भविष्यातील पिढय़ांना व्हॉइस आधारित कॉल सेंटर्समध्ये काम करण्याची फारशी गरज राहणार नाही. अधिक ज्ञान असलेली अर्थव्यवस्था आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने भारत वाटचाल करणार असल्याचे ते म्हणाले.









