राजकोट / वृत्तसंस्था :
तीन सलामीवीरांना सामावून घेण्यासाठी स्वतः चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरण्याचा चांगलाच उलटल्यानंतर आज (दि. 17) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया दुसऱया वनडे सामन्यात विराट कोहली आपल्या नेहमीच्या तिसऱया स्थानी फलंदाजीला येईल, असे स्पष्ट संकेत आहेत. 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली असल्याने भारतासाठी आजची लढत करा वा मरा अशा धर्तीवरील असेल. दुपारी 1.30 वाजता या लढतीला प्रारंभ होणार आहे.
यापूर्वी, मुंबईतील पहिल्या वनडेत डेव्हिड वॉर्नर व कर्णधार ऍरॉन फिंच यांनी तडफदार, नाबाद शतके झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून धुव्वा उडवला. त्या पार्श्वभूमीवर, भारताला येथे सर्व मरगळ झटकून मैदानात उतरावे लागेल, हे स्पष्ट आहे. ऋषभ पंत कन्कशनमुळे येथे खेळू शकणार नसल्याने केएल राहुल यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल, हे निश्चित आहे. वानखेडेवरील लढतीप्रमाणेच येथेही शिखर धवन व रोहित शर्मा सलामीला उतरतील तर चौथ्या स्थानी राहुल व श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पंतच्या गैरहजेरीमुळे कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडेला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
केदार जाधव व शिवम दुबे यांच्यापैकी कोणाला प्राधान्य मिळणार, हे आज स्पष्ट होईल. गोलंदाजीच्या आघाडीवर जसप्रित बुमराहने पुनरागमनानंतर एकदाही लक्षवेधी मारा केलेला नाही. त्यामुळे, त्याच्याकडे येथे लक्ष असणे साहजिक आहे. दिल्ली स्पीडस्टार नवदीप सैनी की शार्दुल ठाकुर, या प्रश्नाचेही उत्तर निवडीत मिळेल. रविंद्र जडेजाचे संघातील स्थान जवळपास निश्चित असून अन्य फिरकीपटूत चहल की कुलदीप याचा फैसला व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. कुलदीपने पहिल्या वनडेत 55 धावा मोजाव्या लागल्या.
ऑस्ट्रेलिया निश्ंिचत
मालिकेत आघाडीवर असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ निश्च्ंिात आहे. शिवाय, डेव्हिड वॉर्नर-फिंच यांच्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ, बहरातील मार्नस लाबुशाने, ऍस्टॉन टर्नर, ऍलेक्स कॅरेसारखे दिग्गज फलंदाज मध्यफळीत असल्याने यामुळे देखील ऑस्ट्रेलियाला फारशी चिंता नाही.
गोलंदाजीत मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स पुन्हा एकदा भेदक मारा करण्यासाठी उत्सुक असतील. ऍडम झाम्पा व ऍस्टॉन टर्नर यांनी पहिल्या वनडेत धावा तर रोखल्याच. शिवाय, ठरावीक अंतराने प्रतिस्पर्धी गडी बाद करण्यातही सातत्य राखले. त्यामुळे, येथेही कांगारुंना त्यांच्याकडून अपेक्षा असतील. यापूर्वी 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलामीची लढत गमावल्यानंतरही भारताने 2-1 असा मालिकाविजय खेचून आणला. त्यापासून प्रेरणा घेत येथेही मालिकाविजय संपादन करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर येथे असेल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट्रिक कमिन्स, सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, पीटर हँडस्कॉम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लाबुशाने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ऍस्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.
कर्णधार विराट कोहलीला मी आजवर वनडेत चारवेळा तर टी-20 क्रिकेटमध्ये दोनवेळा बाद केले आहे. पण, त्याला गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते, याचा मी सातत्याने अनुभव घेतला आहे.
-ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍडम झाम्पा
भारतीय संघात सध्या जितकी स्पर्धा आहे, ते पाहता प्रत्येक फलंदाजाची मिळेल त्या स्थानी फलंदाजीला उतरण्याची तयारी असायला हवी. ठरावीक क्रमांकावरच फलंदाजीची संधी मिळावी, असा आग्रह असून चालणारच नाही.
-मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर
भारतीय संघ येथे सर्वस्व पणाला लावत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. कमिन्स किंवा स्टार्कला विश्रांती देत जोश हॅझलवूडला संघात स्थान देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत.









