5-3 गोलफरकाने मात, कोरियाशी आज जेतेपदाची लढत, भारत-पाक कांस्यसाठी लढणार
वृत्तसंस्था/ ढाका
विद्यमान विजेता व ऑलिम्पिक कांस्यविजेत्या भारताला जपानने 5-3 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. बुधवारी जेतेपदासाठी त्यांची लढत कोरियाशी होणार आहे. अनपेक्षित धक्का बसलेल्या भारताची आता पाकिस्तानशी तिसऱया क्रमांकासाठी लढत होईल.
राऊंडरॉबिन फेरीत भारताने जपानचा 6-0 असा धुव्वा उडविला होता. तसेच जपानविरुद्ध भारताची आजवरची कामगिरीही सरस झाली असल्यामुळे उपांत्य फेरीच्या या लढतीत भारतालाच फेव्हरिट मानले जात होते. मात्र जपानने सर्वांचे आडाखे चुकवून टाकणारी कामगिरी करीत भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे मनसुबे उधळून लावले. या लढतीत पूर्णपणे वेगळा वाटणाऱया जपानने प्रारंभापासूनच जोरदार व वारंवार आक्रमणे करीत भारतीय बचावफळी खिळखिळी करून टाकली. जपानचे गोल शोता यामादा (पहिले मिनिट, पेनल्टीवर), रायकी फुजिशिमा (दुसरे मिनिट), योशिकी किरिशिता (14), कोसेई कावाबे (35), रायोमा ऊका (41) यांनी नोंदवले. भारतातर्फे हार्दिक सिंग (17 व 59 वे मिनिट) व उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (43) यांनी गोल केले.
भारत व जपान यांच्यात यापूर्वी 18 लढती झाल्या होत्या. त्यात भारताने 16 सामने जिंकले आहेत तर जपानला केवळ एक सामना जिंकता आला होता आणि एक सामना अनिर्णीत राहिला होता. आता सुवर्णपदकासाठी जपानची लढत कोरियाशी तर कांस्यपदकासाठी भारताची पाकशी लढत होणार आहे. भारतासाठी ही स्पर्धा अँटीक्लायमॅक्स ठरली आहे. राऊंडरॉबिन फेरीत अपराजित राहून अग्रस्थान पटकावणाऱया भारताला अंतिम फेरी गाठण्यात मात्र अपयश आले. अन्य एका उपांत्य सामन्यात कोरियाने पाकिस्तानचा रोमांचक ठरलेल्या लढतीत 6-5 असा पराभव करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
राऊंडरॉबिन फेरीत अपराजित राहिल्याने भारतीय संघ या लढतीत पूर्ण आत्मविश्वासाने उतरला होता. पण या सामन्यात हा संघ पूर्णतः वेगळा दिसला. सामन्याला सुरू झाल्यापासून जपानने आक्रमणाला सुरुवात केली आणि पहिल्या पूर्ण सत्रात त्यांनीच भारतावर वर्चस्व गाजविले. पहिल्या सहा मिनिटांतच त्यांनी सहा पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, यावरूनच त्यांची हुकूमत दिसून येते. या सहापैकी दोन पेनल्टी कॉर्नर्सचे त्यांनी गोलात रूपांतर केले. पहिल्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे नंतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये रूपांतर झाले. त्यावर यामादाने अचूक गोल नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविलेल्या जपानने भारतीय बचावफळीवर अविरत दडपण कायम ठेवत नंतर दीड मिनिटात पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यापैकी एकावर रायकी फुजिशिमाने जपानचा दुसरा गोल नोंदवला. पहिल्या 15 मिनिटात जपानने भारतीय गोलक्षेत्रात वारंवार आक्रमणे केली तर निराशाजनक कामगिरी करणाऱया भारताला या अवधीत एकही संधी निर्माण करता आली नाही.
दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने दुसऱया सत्रात सुधारित व निर्धारी खेळ केला आणि 17 व्या मिनिटाला पहिले यश मिळविले. कर्णधार मनप्रीत सिंग व दिलप्रीत सिंग यांनी रचलेल्या चालीवर हार्दिक सिंगने मैदानी गोल करीत जपानचा आघाडी कमी केली. 19 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण नीलम संजीप झेसचा प्रयत्न जपानी गोलरक्षकाने फोल ठरविला. जपानने नंतर प्रतिआक्रमणात आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळविला आणि त्यावर किरिशिताने अचूक गोल करीत जपानची आघाडी 3-1 अशी केली.
मध्यंतरानंतर जपानने आणखी दोन गोलांची भर घातली तर भारताने अखेरच्या टप्प्यात जोर करीत आणखी दोन गोलांची भर टाकली. पण ते पराभव मात्र टाळू शकले नाहीत.









