देशावर शोककळा, ‘भारतरत्न’ने सन्मानित भारतीय राजकारणातील दिग्गज नेता हरपला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी राष्ट्रपती, ‘भारतरत्न’ आणि देशातील लोकप्रिय राजकीय नेत्यांपैकी एक असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुखर्जी हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील लष्कराच्या ‘रिसर्च अँड रेफरल’ इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी दिल्लीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुखर्जी हे त्यांच्या राजाजी मार्गवरील घरातील प्रसाधनगृहात पडले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत झालेली रक्ताची गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांना कोविडची बाधा झाल्याचेही उघड झाले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात आलेले असले, तरी त्यांची प्रकृती गंभीर होती. सोमवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती बिघडत असल्याची कल्पना दिली होती. त्यांच्या फुफ्फुसांत जंतुसंसर्ग झाला असून ते अजूनही कोमामध्ये व व्हेंटिलेटरच्या आधारावर आहेत, असे इस्पितळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
त्यानंतर लगेच त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी लोकांना त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. ‘ते एक लढवय्या असून लोकांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांनी ते नक्कीच ठीक होतील’, असे अभिजित यांनी ट्विट केले होते. पण तीन तासांनंतर त्यांचे देहावसान झाले असल्याचे अभिजित यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यांच्यापश्चात दोन पुत्र व एक कन्या असा परिवार आहे. मुखर्जी यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रासह विविध स्तरांतील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पाच दशकांची राजकीय कारकीर्द
मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द सुमारे पाच दशके चालली. या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात तसेच स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्व. पी. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विविध महत्त्वाची पदे भूषविली. पाच दशके काँग्रेसशी संबंधित राहिलेले मुखर्जी हे सात वेळा संसदेत निवडून गेले. राजकारणात पहिले पाऊल टाकण्यापूर्वी शिक्षक आणि पत्रकार म्हणून त्यांनी काम केले होते. 1969 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. त्यानंतर चार वेळा ते राज्यसभेवर निवडले गेले. 2004 मध्ये बंगालच्या जंगीपूर येथून लोकसभेची पहिली निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर ते 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
अनेक महत्त्वाची खाती हाताळली
1972 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी सर्वप्रथम इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. काँग्रेस सरकारांमध्ये वित्त, वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण अशी काही सर्वांत शक्तिशाली खाती त्यांनी हाताळली. डॉ. मनमोहन सिंग सरकार सत्तेवर असताना मुख्य संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
राष्ट्रपतीपदाचा मान
सार्वजनिक जीवनातील मुखर्जी यांच्या प्रवासाचा शेवटचा थांबा राष्ट्रपती भवन राहिला. काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीचे उमेदवार असलेले मुखर्जी 2012 मध्ये भारताचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2012 ते 2017 असा त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ राहिला.
‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये प्रणव मुखर्जी यांच्या कार्याची व योगदानाची दखल घेऊन त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना ‘आमच्या काळातील उत्कृष्ट राजकारणी’ म्हणून संबोधित केले होते.









